आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएच.डी.साठी साडेनऊ हजारांवर अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुणे विद्यापीठातर्फे 17 नोव्हेंबरला घेण्यात येणार्‍या पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी साडेनऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात थेट मुलाखतीसाठी किंवा पहिल्या पेपरमधून सूट मिळणार्‍या जवळपास 3300 उमेदवारांचा समावेश आहे.

पुणे विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत पीएचडीसाठी परीक्षाच घेतली नव्हती. आता सुमारे पाच हजार जागांसाठी जाहिरात काढून प्रवेश अर्जही मागवण्यात आले आहेत. रविवारी सकाळी 9 वाजेपासून ही परीक्षा होणार असून, दोन लेखी पेपरमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मुलाखतीस पात्र होतील. त्यात पात्र ठरलेल्यांना प्रत्यक्ष संशोधन करता येईल.

6200 उमेदवार देणार परीक्षा : एकूण सुमारे साडेनऊ हजार अर्ज आले असले तरी 6200 उमेदवारच प्रत्यक्षात परीक्षा देतील. कारण 2010 साली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, मात्र पीएचडीसाठी प्रवेश न मिळालेल्यांना परीक्षा देण्याची गरज नाही. अशा काही उमेदवारांना पेपर-1 मधून सूट देण्यात आली असून, पेपर-2 मात्र द्यावा लागणार आहे. आपल्या क्षेत्रातील दहा वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना कुठलाही पेपर देण्याची गरज नसून, केवळ त्यांनी प्रवेश परीक्षेचा अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यांना थेट मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

95 टक्के विद्यार्थ्यांना मिळाले प्रवेशपत्र
रविवारी (दि. 17) होणार्‍या पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच मिळाले नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, विद्यापीठाने प्रवेशपत्र उमेदवारांच्या मेल आयडीवरच पाठवले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून 12 वाजेपर्यंत 95 टक्के उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड केल्याचे विद्यापीठाने सांगितले. यामुळे परिक्षार्थींना आता परीक्षा देता येणार आहे.