आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोड- दोन दिवसांपूर्वीच मंजुरी मिळालेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा प्रारंभ नाशिकरोड नव्हे तर ओढा येथून होणार असून, सिन्नर येथील खासगी इंडिया बुल्स प्रकल्पाच्या रेल्वे मार्गाशी या प्रकल्पाचा संबंध नसल्याचे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दरम्यान, पंचवटी एक्स्प्रेसला अतिरिक्त बोगीची मागणी त्यांनी मान्य केली.
केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या पदवीदान समारंभासाठी नाशिकरोडला आले असताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की बहुचर्चित नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्प आर्थिक अडचणीमुळे रखडला होता. खासदारांच्या दबावामुळे त्याला मंजुरी मिळाली असून, दोन-तीन महिन्यांत याबाबतचा अध्यादेश निघेल. जैन पुढे म्हणाले की, जमीन हस्तांतरण व 50 टक्के खर्च ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. ओढा-चिंचवड दरम्यानचे सर्वेक्षण मध्य रेल्वेने स्वतंत्र केले आहे. त्यामुळे इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गाशी याचा काहीच संबंध नाही. त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल. मनमाड-इंदूर मार्गासाठी मध्य प्रदेश शासनाने जमीन देण्याची तयारी दर्शवली. मात्र, 50 टक्के खर्चास नकार दिल्याने प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
पंचवटीला बोगी वाढवणार : महाप्रबंधक जैन यांची भेट घेऊन आमदार बबनराव घोलप यांनी रेल्वेविषयक मांडलेल्या मागण्यांपैकी पंचवटी एक्स्प्रेसला एक बोगी वाढवण्याची मागणी तात्काळ मान्य केली. मात्र, गोदावरीची मागणी फेटाळून लावली. गोदावरी-कुर्लाएवजी दादरपर्यंत ती सोडणे शक्य नसल्याचे सांगत राज्यराणी दादरपर्यंत नेण्याबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयातच उत्तर दिले जाईल, असे जैन यांनी सांगितले.
ओढय़ाला प्लॅटफॉर्म
ओढा येथून गंगाघाटाचे अंतर नाशिकरोडपेक्षा कमी असल्याने व चौपदरी रस्ता झाल्याने स्थानकाचा विकास, प्लॅटफॉर्मची उंची वाढवून प्रवासी गाड्या सोडण्याची मागणी घोलप यांनी केली. प्रत्यक्ष पाहणी, सिंहस्थ निधी उपलब्धेनंतर त्याचा विचार होईल. तत्पूर्वी प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देताना नाशिकरोडचा पार्किंगचा प्रश्न लवकरच सुटेल. पूर्वेकडील सुधारणा, प्लॅटफॉर्मवरील पुलाची लांबी, स्कायवॉकबाबत प्रस्ताव दाखल असून, त्यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही
इंडिया बुल्स प्रकल्प व नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी एकच रेल्वे मार्ग असणार आहे. मार्ग निर्मितीसाठी जमीन हस्तांतरण करताना कुठल्याही शेतकर्याचे नुकसान होऊ देणार नाही. गैरसमज करून शेतकर्यांनी विचलित होऊ नये.
-खासदार समीर भुजबळ
अलाहाबाद दुर्घटनेने नाशिकला खबरदारी
नाशकातील कुंभमेळ्यात अलाहाबाद येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानकावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रवासी गांडी थांबवण्यात येईल. अन्यथा ती घोटी, देवळाली कॅम्प येथे थांबवण्यात येईल. बॅरिकेड्स लावले जातील. इगतपुरी, घोटी येथून भाविकांना नाशकात येण्यासाठी शटल चालवण्याचा निर्णय घेतला जाईल. कुंभमेळ्यात ठिकठिकाणी तिकीट केंद्र सुरू करू, असे जैन यांनी सांगितले.
संयुक्त बैठक
सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड, ओढा स्थानकाचे विस्तारीकरण व इतर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे नियोजन करण्यास सांगितले. या बैठकीत संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे जैन यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा दलात महिलांचा सहभाग हा मध्य रेल्वेच्या प्रयत्नामुळे सुरू झाला. नाशिकरोड प्रशिक्षण केंद्र भविष्यात सर्वोत्कृष्ट म्हणून उदयास येईल, असेही जैन म्हणाले.
स्थानकाचा विस्तार
नाशिकरोड बसस्थानक मेनगेट येथील केंद्र शासनाच्या जागेत स्थलांतरित करून स्थानकाचा दोन्ही बाजूने विकासाच्या मागणीवर त्यांनी जमीन हस्तांतरणानंतरच हा निर्णय शक्य आहे. जागा ताब्यात आल्यास तेथे बहुद्देशीय संकुल उभारणीबाबत विचार केला जाऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.