आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅकेजिंग बदल करणार अन्नपदार्थ सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अन्न उत्पादनांबाबतची सुरक्षा आता अधिक कडक होणार असून, लेबलिंगच्या तरतुदीत व्यापक बदल करण्यात आले आहेत. सध्याची लेबल्स केवळ सहा महिने चालणार आहेत. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने ‘अन्नसुरक्षा आणि मानके कायदा 2006’ मध्ये केलेल्या या बदलामुळे गुणवत्ता व शुद्धता राखली जाण्याबरोबरच यंत्रणेला कारवाई करणेही सुलभ होणार आहे.

मिठाई, बेकरी उत्पादने, उपवासाचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स आदींबाबत अन्न औषध प्रशासनाकडे अनेक तक्रारी येतात. मात्र, अन्नपदार्थांचे पॅकेजिंग करून विक्री केली जात असताना त्यावर उत्पादक किंवा रिलेबलिंग किंवा पॅकेजिंग करणार्‍याचा पत्ताच नसतो. यामुळे कारवाई गुंडाळावी लागते. आता कायद्यातील या नव्या बदलाने जबाबदारी निश्चित करणे सुलभ होणार असून, कारवाईही वेगाने होणे शक्य आहे. त्यानुसार अन्नपदार्थांचे उत्पादन, पॅकेजिंग वा रिलेबलिंग करणार्‍यांना आता लेबल्समध्ये बदल करावा लागणार आहे. या व्यावसायिकांना या लेबल्सवर स्पष्ट अक्षरात व्यवसायासाठीचा परवाना क्रमांक आणि नोंदणी क्रमांकाची छपाई करावी लागेल. उत्पादनांच्या बाबतीत काही तक्रार आली तर लेबल्सवरील या क्रमांकांवरून उत्पादकापर्यंत पोहाचता येऊन कारवाई करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि शुद्धता याबाबत उत्पादकाला तडजोड करता येणार नाही.

चेंबरकडून मार्गदर्शन
भविष्यातील कारवाई टाळण्यासाठी या कायद्यातील बदलांबाबत जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र चेंबरने व्यवस्था केली असून, याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास सारडा संकुल येथील चेंबरच्या कार्यालयात संपर्क साधावा. संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस

जुन्या लेबल्सना सहा महिन्यांची मुदत
पॅकेजिंगसाठी सध्या वापरली जाणारी लेबल्स पुढील सहा महिनेच वैध असतील. त्यानंतर कायम राहिल्यास कारवाई होणार आहे. नव्या लेबल्सवर ‘एफएसएसए’चे चिन्ह (लोगो) व ‘एफएसएएल’कडून घेतलेला परवाना क्रमांक (अंडाकृती आकारात) दर्शवावा लागेल.