आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत सातही दिवस सशुल्क दर्शन पासेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - तिरुपती देवस्थाच्या धर्तीवर व्हीआयपी दर्शन पास सातही दिवस सशुल्क करण्याच्या निर्णयाची बुधवारपासून शिर्डीत अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या पासेससाठी शिफारशीची अट कायम ठेवण्यात आली. या कार्यालयामार्फत देण्यात येणारे पासेस पूर्वीच्या पद्धतीनेच देण्यात येतील. मात्र, ते ऑनलाइनप्रमाणेच सातही दिवस सशुल्क असतील.
गेल्या तीन वर्षांपासून संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी व रविवारी सशुल्क तर सोमवार ते शुक्रवार व्हीआयपींचा दर्जा किंवा शिफारस बघून विनामूल्य दर्शन पास देण्यात येत असत. आरती पासेस मात्र सर्व दिवस सशुल्क होते. एकीकडे सामान्य भाविकांना ऑनलाइनच्या माध्यमातून सातही दिवस सशुल्क पासेस दिले जायचे तर, दुसरीकडे व्हीआयपींना आठवड्यातील पाचही दिवस केवळ पद व शिफारशीवर विनामूल्य दर्शन पासेस देण्यात येत होते. ही अन्यायकारक तफावत दूर करण्यासाठी व्यवस्थापनाने ऑनलाइनप्रमाणेच जनसंपर्क कार्यालयातही सातही दिवस सशुल्क पासेस देण्याचा निर्णय घेतला. यासाठी जनसंपर्क कार्यालयात कुणाचीही शिफारस लागणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, ऐनवेळेस गर्दीने व्यवस्थापन कोलमडू नये यासाठी शिफारशीची पूर्वीचीच पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही स्थानिक नेत्यांनीही आपले दर्शन, आरती पासेस सशुल्क करण्याच्या निर्णयाची बुधवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.
व्हीआयपी कोण?

केंद्र व राज्यातील मंत्री, आजी- माजी मंत्री, आमदार, खासदार, विद्यमान न्यायाधीश, आयएएस, आयपीएस अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि विश्वस्त हे स्वत: व्हीआयपी कोट्यातून दर्शन घेऊ शकतील. तसेच, त्यांच्या शिफारशीवर या व्हीआयपींचे आप्त स्वकीयही विशेष पासवर दर्शन घेऊ शकतात.
नियमात बदल कशासाठी?

आरती सशुल्क केल्यानंतर आरती पासेस मागणाऱ्यांची संख्या घटून रांगेतील सामान्य भाविकाला आरती सहज मिळू लागली होती. आता सातही दिवस दर्शन सशुल्क झाल्याने फुकट पासेस मिळवणाऱ्यांची संख्या आपोआपच कमी होणार आहे. याशिवाय ऑनलाइन कुणालाही पास मिळणार असल्याने काळाबाजारही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.