आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैगंबर जयंतीदिनी यंदा ‘शांतता दिवस’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इसिसच्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम बांधवांकडून विशेष मोहीम राबविली जात असताना, आता अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जाणारा पैगंबर जयंतीचा दिवस अर्थात ईद मिलादच्या दिवशी यंदा ‘यौमे अमन’ म्हणजे शांतता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. तर रबिउल अव्वल या उर्दू महिन्याची सुरुवात शनिवारी झाली असल्याने शनिवारपासून विविध प्रवचन मशिदींमध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांची जयंती २४ डिसेंबर रोजी साजरी होत आहे. यासाठी शनिवार(दि. १२)पासून जिल्हाभरात बारा दिवस विविध कार्यक्रम केले जातात. यंदा या काळात दहशतवादी संघटनेचा निषेध करून ‘शांतता दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. हा शांतता दिवस कसा साजरा करायचा, याची तयारी मुस्लिम धर्मगुरूंकडून आतापासूनच सुरू झाली असून, शुक्रवारच्या दिवशी होणाऱ्या जुम्माच्या नमाजमध्ये मुस्लिम धर्मगुरूंकडून या उपक्रमाबाबत विविध मार्गदर्शन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जगभरात ‘इस्लाम’ धर्माच्या नावाखाली काही दहशतवादी संघटना काही देशांत हल्ले करत आहेत. त्या दहशतवादी संघटनेचा इस्लामशी काहीएक संबंध नसतानाही त्यांच्याकडून इस्लाम हे नाव वापरले जात आहे. तसेच, जिहादच्या नावावर चालणारे गैरप्रकार, दहशतवाद चुकीचे असून, इस्लामची खरी शिकवण जिहादला कधीही परवानगी देत नाही. गरीब शोषितांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा "जिहाद’चाच भाग आहे. यासाठी जनजागृती गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली असून, प्रत्येक मशिदीमध्ये दहशतवादाविरोधात प्रवचनात मार्गदर्शन केले जात आहे.

अशा संघटनांपासून लांब रहा : मशिदींमध्येही जनजागृती
चुकीच्यागोष्टींपासून लोकांना परावृत्त करणे आणि चांगल्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हादेखील जिहाद आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिहादच्या नावाखाली काही दहशतवादी संघटना ज्यांना इस्लाम धर्माशी काही घेणे देणे नसताना ते ‘इस्लाम’ या नावाचा वापर करून इस्लाम शब्दाचा दुरुपयोग करत असल्यामुळे अशा घटकांकडून दूर राहण्याचे आवाहन प्रत्येक मशिदीमध्ये मशिदीच्या इमामांमार्फत केले जात आहे.

इसिसमुळे धर्माची बदनामी
^इसिसमुळे इस्लामची बदनामी होत असून, एका माणसाचा बळी म्हणजे संपूर्ण माणूस जातीचा बळी, असे इस्लाम शिकवतो. म्हणून यंदा ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘यौमे अमन’ म्हणजे ‘शांतता दिवस’ साजरा होईल. सय्यद मीर मुख्तार अशरफी, सचिव,सुन्नी सिरत कमिटी
बातम्या आणखी आहेत...