आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Painter Ravi Paranjape, Latest News In Divya Marathi

रंगछटा: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार रवि परांजपे यांचा रसिकांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चित्रकाराला आपली शैली गवसण्यासाठी एखादा क्षण पुरेसा असतो. अशा वेळी कोणतीही गोष्ट ठरवून होत नसते. माझ्याही आयुष्यात ही शैली एका प्रसंगामुळे गवसली, कामाच्या शोधात विषण्ण अवस्थेत सुटीच्या दिवशी खेळता खेळता रेषांची गोलाई सापडली, तिच पुढे माझी शैली बनत गेली. असा संवाद आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार रवि परांजपे यांनी रसिकांशी साधला.
काकासाहेब वाघ यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त कुसुमाग्रज स्मारकात राहुल देशपांडे आणि गोपाळ नांदूरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी संवाद साधला. बेळगाव येथे माझा जन्म झाला, घरात कलेचा वारसा होताच. त्यामुळे माझ्या अंगी आलेली कला ही आजी, आई आणि वडिलांचीच देण आहे. मी अभ्यासापेक्षा रंगांमध्येच रमायचो. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी हातात कुंचला दिला. त्याचं रूपांतर चौदाव्या वर्षी प्रकट रेखाटणात झालं, त्यानंतर मोठ्या चित्रकारांची चित्र पाहण्याचा छंदच जडला. यानंतर फोटोवरून स्मरण चित्र काढायला लागलो, फोटोवरून यासाठी की, व्यक्तींच्या प्रमुख हालचाली दाखवणा-या रेघा या फोटोवरून अचूक टिपता यायच्या. अशी माहिती देताना पुढे ते म्हणाले, स्वत:ची शैली गवसताना जसा एक क्षण पुरेसा होता, तसा टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करताना माझ्या ख-या करिअरची सुरुवात झाली असं म्हणता येईल. पूर्वी जाहिरातींसाठी इल्युजन करायचो. इल्युजनमध्ये तुमच्या कल्पनेची कसोटी असते. यात काम करतांना डिझाइन, कंपोझिशन, अ‍ॅडव्हर्टायझिंग अशा अनेक क्षेत्रांत काम करता येतं, अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.तसेच कार्यक्रमासाठी मान्यवरांमध्ये संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, डीन बा. वि नगरकर, प्राचार्य अंकुर भट्ट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रंग चित्रमय आठवणींचे
कार्यक्रमात रवि परांजपे यांची काही चित्र दाखवली जात असतानाच ते या चित्राबाबत आठवण सांगत होते. एका महिलेचं चित्र असलेल्या जाहिरातीबाबत ते म्हणाले, पूर्वी शांता शेळकेंच्या चार ओळींवर चित्र काढायचो, नंतर माझ्या चित्रांवर त्या कविता करायच्या. तसेच या पुस्तकातील ह्युमन फिगरही माझ्या लक्षात आहेत. कल्पनाशक्तीचा कस लावणारी ही कामे माझ्या आयुष्यात मैलाचा दगड ठरतात.