आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडकी पैठणी युनेस्कोच्या ‘वर्ल्ड हेरिटेज’मध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - आजवर भारतीय स्त्रीमनाला कायम मोहिनी घालणार्‍या मराठमोळ्या लाजवाब पैठणीने आता जगालाही भुरळ घातली आहे. पैठण आणि येवला येथील विणकरांच्या कलाकुसरीतून साकारणारी उठावदार पैठणी ‘युनेस्को’च्या प्रस्तावित वारसा स्थळांच्या यादीत (वर्ल्ड हेरिटेज) समाविष्ट करण्यात आली आहे.
अहोरात्र कष्ट करून रंगीबेरंगी पैठणी सजवताना आपल्या अत्युच्य आणि सर्वसुंदर निर्मितीचा मनस्वी आनंद लुटणार्‍या विणकरांचा हा आनंद युनेस्कोच्या निर्णयामुळे आता गगनात मावेनासा झाला आहे. सोळाव्या शतकापासून भारतात विणकरांनी या हस्तकलेची जपणूक केली. आता सातासमुद्रापार या कलेची दखल घेण्यात आली आहे.
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी भारताने ‘युनेस्को’ला 33 प्रस्ताव पाठवले होते. याशिवाय ‘युनेस्को’ने स्वत:हून 15 ठिकाणे निवडून 48 प्रस्तावित स्थळे निश्चित केली. युनेस्कोच्या संकेतस्थळावर ‘आयकॉनिक सारी वीव्हिंग क्लस्टर्स आॅफ इंडिया’ या शीर्षकाखाली, देखण्या व कलात्मक कारागिरीची परंपरा असलेल्या साड्यांसाठी प्रसिद्ध आठ शहरांचा समावेश आहे. त्यात पैठण, येवलासह आंध्र प्रदेश, आसाम व मध्य प्रदेशातील शहरांचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे.
भारतात पैठणीला आजही प्रचंड प्रतिष्ठा आहे. या पैठणीच्या बांधणीत वापरल्या जाणार्‍या जरतारीनुसार तिचा दर्जा आणि किंमत ठरते. या महावस्त्राची किंमत हजारात असो किंवा लाखात; महिलांच्या मनात मात्र ती कायम लाखमोलाचीच असते. पैठणीची कारागिरी आणि कलाकौशल्याचे हे मोल खरेच अनमोल आहे याची प्रचिती आता युनेस्कोच्या निर्णयामुळे आली आहे. म्हणूनच लाडकी पैठणी ‘वर्ल्ड हेरिटेज’ ठरली आहे.
काळ बदलला, क्रेझ कायम
पैठणी असे महावस्त्र आहे की, त्याची बांधणी व कलात्मकता नजरेत भरणारी आहे. महिलांना आकर्षित करताना युग बदलले; पण या वस्त्राची क्रेझ बदलली नाही. त्यामुळे हा विणकरांच्या श्रमाचा गौरव असल्याचे मी मानतो.
राजेश भांडगे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त उत्पादक