आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पान दुकानांचा रंग फिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- गुटखा बंदी स्वागतार्ह असली तरीही, शासनाने सर्वच वस्तूंवर घातलेली सरसकट बंदी अन्यायकारक असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी शहरातील हजारो पान दुकानदारांनी शुक्रवारी कडकडीत बंद पुकारला.

नाशिक जिल्हा पान विडी विक्री संघाने नाशिकरोडच्या बीएमएस मार्केट व नाशिकच्या स्वामी सर्मथ मंगल कार्यालयात बैठक घेतली. त्यात या निर्णयाविरोधात शनिवारी (दि. 27) पालकमंत्री छगन भुजबळ यांना संघातर्फे निवेदन देण्याचे ठरले.शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनही छेडले जाईल, असे संघाचे अध्यक्ष योगेश भगत यांनी सांगितले, तर पान टपरी व होलसेल मावा विक्रेत्यांच्या बैठकीत विजय कासलीवाल म्हणाले की, पानविक्रेत्यांना पूर्वसूचना न दिल्याने विक्रेत्यांकडील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. विक्रेत्यांवर 382 कलमान्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, तो अन्यायकारक आहे. बैठकीस नीलेश कासलीवाल, रफिक शेख, महेंद्र ओस्तवाल, अशोक डोईफोडे, अनिल तारवाणी, बाबूशेठ तारवाणी, हिरानंद बंधू, रामविलास लोहिया, शैलेश वैद्य, प्रकाश लोकवाणी यांच्यासह होलसेल विक्रेते उपस्थित होते.

कुटुंबांचा प्रश्न
शहरात चार ते पाच हजार पान दुकानदार, 300 फिरते विक्रेते तसेच पंधरा हजार पानविडी विक्रेते असून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालत आहे. बंदीच्या निर्णयामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होणार असून उपासमारीची वेळ येणार आहे. योगेश भगत, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पान विडी विक्री संघ

लाखोंची उलाढाल ठप्प
नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी या ठिकाणचे एकूण चार हजार विक्रेते आहेत.छोट्या विक्रेत्याचा दिवसाकाठी किमान 1500 रुपये धंदा आहे. त्यानुसार चार हजार विक्रेत्यांच्या व्यवसायाची तुलना करता दिवसाला जवळपास 60 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली.