आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटी आणि गोदावरी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - अस्वली-पाडळी रेल्वेस्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने अनेक गाड्या रद्द व काहींचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गुरुवारी दिवसभर कडाक्याची थंडीत वाजत असताना प्रवाशांना कुडकुडत स्थानकावर गाडीची वाट बघत बसावे लागले. त्यामुळे नाशिकरोड स्थानकावरील प्रवासी वेटिंग रूमसह तीनही प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या गर्दीने भरलेले होते. जिल्ह्यातील चाकरमान्यांची पंचवटी, गोदावरी अचानक रद्द झाल्याने अनेक चाकरमान्यांना मुंबईला जाण्याची सोय नसल्याने नाईलाजास्तव सुट्टी घ्यावी लागली, तर अनेकांनी बसचा मार्ग निवडला. त्यामुळे नाशिकरोड ते नाशिक शहर बससेवा, टॅक्सी, रिक्षाचालकांचे भाव वधारले होते.
तासन्तास प्लॅटफॉर्मवर ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी रेल्वे उपाहारगृह, कॅन्टीनवरील खाद्यपदार्थांवर दिवसभराची भूक भागवावी लागली. स्थानकाच्या जवळपासच्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. कंटाळून गाडी येण्याची निश्चित ठिकाणी जाण्याची सोय होत नसल्याचे बघून अनेक प्रवाशांनी
तिकीट रद्द करण्यासाठी व पैसे परत घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येकाला उत्तर देताना रेल्वे अधिका-यांची काल दिवसभर दमछाक झाली.
नाशिकरोड बसस्थानकावर काल दिवसभर प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे शहरी बसच्या जादा फे-या सोडण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या गाड्या नाशिकरोड, देवळाली कॅम्पपर्यंत येऊन रद्द झाल्या. त्या गाड्या त्यांच्या परतीच्या वेळेपर्यंत येथेच थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांचे जेवणाचे हाल झाले व जवळपास बारा तासांपेक्षा अधिक तास एकाच जागी गाडीत बसून राहावे लागले. परतीच्या वेळेत गाडी पुन्हा जेथून आली तिकडे रवाना झाल्यामुळे त्या प्रवाशांना निश्चितस्थळी जाताच आले नाही. दरम्यान, हा अपघात होता की घातपात अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, याबाबत ग्रामिण पोलिसांशी संपर्क साधला असता घातपात नसल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या गाड्यांबाबत अनिश्चितता? - ट्रॅक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी ते काम कधी पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आज दि. 20 रोजी मध्य रेल्वेच्या गाड्या नियोजित वेळेत धावतील की नाही हे निश्चित सांगता येणार नाही. तसेच त्या गाड्या रद्द आहे की नाही याबाबत मुख्यालयाकडून कोणतीच सूचना प्राप्त झाली नाही. - आर. के. कुठार, अधीक्षक, नाशिकरोड रेल्वेस्थानक