आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandurang Salgaonkar News In Marathi, Bowler, Divya Marathi, Artist

गोलंदाज बनण्यासाठी खांद्यात रग आणि मनात जिद्द हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अस्सल कलाकार ज्याप्रमाणे जन्मावा लागतो, त्याप्रमाणेच अस्सल वेगवान गोलंदाजही जन्मावा लागतो, कुणालाही जलद गोलंदाज बनवता येत नाही. त्यासाठी खांद्यात रग, मनगटात ताकद आणि मनात जिद्द असलेले आणि बालपणापासूनच कणखर स्वरूपाचे व्यक्तिमत्त्व लाभलेले गोलंदाज आम्ही शोधत असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर यांनी केले.


महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नाशकातील गुणवत्तावान वेगवान गोलंदाज शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी प्रक्रियेत रविवारी जिल्हाभरातून 70 - 75 गोलंदाज उपस्थित होते. या प्रक्रियेत रविवारी दिवसभर झालेल्या चाचण्यांमधून सुमारे 17 गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याशिवाय अन्य काही गोलंदाजांची चाचणी अद्याप बाकी असून, त्यांची चाचणी सोमवारी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


मुलांमध्ये उन्हात राबण्याची वृत्ती हवी : जलदगती गोलंदाज हा निसर्गत:च कणखर असावा लागतो. सध्याच्या काळात घरोघरी एखादाच मुलगा असतो. त्यामुळे आई -वडील त्याला उन्हातही जाऊ देण्यास राजी नसतात. अशा स्थितीत मुले कणखर बनणे शक्य नाही. त्यामुळेच भारतातील शहरी भागातून अस्सल वेगवान गोलंदाज मिळणे दुरापास्तच आहे. गोलंदाज बनण्यासाठी उन्हात दिवसभर घाम गाळण्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती व वृत्ती लागते. तिचाच अभाव शहरी भागात दिसून येतो. त्यामुळे भविष्यात भारताला 140 किलोमीटरच्या वेगाचे वेगवान गोलंदाज नाशकातील ग्रामीण आणि आदिवासी भागातूनच शोधावे लागणार असल्याचेही साळगावकरांनी नमूद केले.
प्रशिक्षकाचे मन लोण्यासारखं मऊ आणि प्रसंगी लोखंडासारखे टणक लागते : मोठा खेळाडू घडण्यासाठी त्याला चांगला प्रशिक्षक लाभणे अत्यावश्यक असते. चांगला प्रशिक्षक बनण्यासाठी त्याचे मन एकाचवेळी खेळाडूच्या काळजीसाठी लोण्यासारखे मऊ व त्याच्याकडून मेहनत करून घेण्यासाठी लोखंडासारखे टणक असावे लागते, असेही त्यांनी नमूद केले. चांगल्या खेळाडूत प्रशिक्षक स्वत:लाच बघत असतो. परंतु, अशा वेळी त्या खेळाडूनेही प्रशिक्षकाच्या शब्दाबरहुकूम वागले तरच त्याचा भरभर विकास शक्य असल्याचेही साळगावकर यांनी सांगितले.


सुनील गावस्कर जखमी झाल्याची आठवण
1973 मध्ये नाशिकच्या पोलिस परेड मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात पांडुरंग साळगावकर यांच्या गोलंदाजीवर महान क्रिकेटपट्ट सुनील गावस्कर जखमी झाले होते. त्यावेळी तो सामना प्रचंड गाजल्याची आठवण काढणारे ज्येष्ठ क्रिकेटप्रेमी अजूनही भेटत असल्याचे साळगावकर म्हणाले.

मजबूत शरीरयष्टी हेच वेगवान गोलंदाजाचे भांडवल
सहा फुटांच्या आसपास उंची व मजबूत शरीरयष्टी हेच वेगवान गोलंदाजाचे प्रमुख भांडवल असते. हे गुण ज्या 15 -16 वर्षांच्या मुलात असतील, त्याला वेगवान गोलंदाज बनण्याची संधी असते. तशाच स्वरूपाचे मटेरिअल असलेले गोलंदाज आम्ही शोधत असून, या मोहिमेला नाशिकपासून प्रारंभ झाला असला तरी ते हळूहळू पूर्ण राज्यात घेतला जाणार असल्याचेही साळगावकर म्हणाले.