नाशिक- राज्यातील बालगृहांचे प्रलंबित भाेजन अनुदान डिसेंबरच्या अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असून येत्या संक्रांतीपर्यंत अर्थात १४ जानेवारीपर्यंत सर्वच बालगृहचालकांपर्यंत हे अनुदान पाेहोचलेले असेल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
बालगृहचालकांच्या शिष्टमंडळाने मुंडे यांची मंत्रालयात भेट घेतली. या वेळी त्या बाेलत हाेत्या.
महिला अाणि बालविकास विभागाची मान्यता असलेले ९९६ स्वयंसेवी बालगृहांचे २०५ काेटींचे भाेजन व कर्मचारी वेतन अनुदान रखडल्याचे वृत्त "दिव्य मराठी'त प्रसिद्ध झाले हाेते. एेन दिवाळीत किराणा अाणि धान्य व्यापाऱ्यांनीही उधारीत अन्नधान्य पुरवठा करण्यास नकार दिल्याने बालगृहचालकांसमाेर माेठा प्रश्न निर्माण झाला हाेता. किमान दिवाळीचा सण काढण्यासाठी बालगृहचालकांच्या संघटनेने राज्यभर दानशूरांच्या बैठका घेत अनाथ बालकांना दिवाळीपुरता अाश्रय देण्याचे अावाहन केले. त्यानुसार विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी पाच दिवसांसाठी राज्यातील २० हजार बालकांना दिवाळीच्या काळात अापल्या घरी पाहुणचार केला. मात्र, त्यानंतर ही मुले पुन्हा बालगृहात परतणार असूनत्यांच्या भाेजनाची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न अाश्रमशाळा चालकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी'ने महिला अाणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या डिसेंबरमध्ये हाेणाऱ्या अधिवेशनात पुरवणी बजट मंजूर करून घेण्याची ग्वाही दिली.
बालगृहापर्यंत अनुदान
बालगृहचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे यांची भेट घेऊन अनुदानाची चर्चा केलीे. त्यांनी येत्या संक्रांतीपर्यंत प्रत्येक बालगृहापर्यंत अनुदान पाेहोचण्याची ग्वाही दिली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाेशी, सरचिटणीस माधवराव शिंदे, रामदास चव्हाण (नांदेड), बाबासाहेब चव्हाण (परळी), बालाजी मुस्कडवाड (लातूर), चंद्रकांत सुकुनगे ( नांदेड), ललिता कुंभार ( नांदेड), रामभाऊ शिंदे (उस्मानाबाद ) उपस्थित हाेते.
या निर्णयामुळे बालगृह चालक अाणि बालकांमध्ये अानंदाचे वातावरण निर्माण झाले असून यापुढील काळात बालगृह निश्चितच तग धरतील, असा विश्वास निर्माण झाला अाहे.