आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीयतेच्या विळख्यातून..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्ताचा सडा, रक्ताच्या थारोळ्यातील शरीरांच्या खांडोळ्या बघून एक उपनिरीक्षक जागेवरच भोवळ येऊन पडले. बकर्‍यांप्रमाणे शरीराचे तुकडे बघून सगळेच थक्क झाले. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेचं वर्णन साहेबराव पाटील करत होते. या वेळी गुन्हेगारांना फासापर्यंत पोहोचवून जातीयतेचा विळखा तोडल्याचे काम त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होते.

नवीन पनवेल येथील शीख कुटुंबीयांच्या हत्याकांडाची उकल तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त साहेबराव पाटील यांनी कुठलेही धागेदोरे हाती नसताना आपले कसब पणाला लावून गुन्हेगारांना फासापर्यंत पोहोचवले. 30 मे 1999 रोजी वर्ल्डकपमधील भारत-इंग्लंडमधील सामना बघण्यात सर्व दंग असताना दूरध्वनी खणाणला. एकाने ती माहिती घेतली आणि धावतच उपनिरीक्षकांना नवीन पनवेल ‘सेक्टर 12’मध्ये एकाच घरातील चौघांची हत्या झाल्याचे त्याने सांगितले. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अर्धवट शरीर, बाजूलाच एकेका अवयवाचे खांडोळे बघून एक उपनिरीक्षक जागेवरच भोवळ येऊन पडले. बकर्‍यांप्रमाणे शरीराचे तुकडे बघून सारेच थक्क झाले. वायरलेसवरून श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. तोपर्यंत रात्रीचा दीड वाजला होता. आसपासच्या रहिवाशांना या घरात असे काही घडले असेल, याची कल्पनाही नव्हती. श्वानपथकानेही हल्लेखोरांचा धारदार सुरा शोधून रस्त्यापर्यंतच माग दाखविला. घरातील कागदपत्रांवरून पनवेल येथेच वर्कशॉप चालविणारे दिलीपसिंग माथारू यांच्यासह त्यांची पत्नी लखविंदर, दोघे मुले रविंदर आणि हरविंदर यांची हत्या झाल्याचे उघड झाले. अतिशय साधे-सरळ, कोणाशीही वैर नसलेल्या माथारूंच्या घरातून लूटमारही झालेली नसल्याने हत्येचे गूढ वाढले. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी साहेबराव पाटील यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविली.
दुसर्‍या दिवशी गोल्डी नावाच्या इसमाने हत्याकांडातून रविंदरसिंगची पत्नी राजविंदरकौर बचावली असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याची हिंट दिली. धक्का बसल्यामुळे तिच्या मनावर परिणाम होऊ शकतो, तिला चार दिवसांनंतर बोलता येईल, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तपासात खंड पडण्याची भीती होती. दरम्यान, गोल्डीच्या चौकशीत राजविंदरकौरचे माहेर कळंबोलीचे असून, त्यांच्यात काहीतरी वाद झाल्याचेही कळले. कंळबोलीत ट्रान्स्पोर्ट कार्यालयातील चौकशीत एका कामगाराने बलदेवसिंग सरदार यांची मुलगी नवीन पनवेलमध्ये विवाह करून गेल्याचे सांगितले. पोलिस रेकॉर्डनुसार राजविंदरच्या कुटुंबीयांनी पती रविंदरसिंगविरोधात फूस लावून नेल्याची तक्रार दिल्याचेही समोर आले.
अनेक प्रश्न डोक्यात घेऊनच पोलिस बलदेवसिंग यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी हत्येबद्दल सांगितले. मात्र, यावर ‘राजविंदर का पता नही और उसके साथ रिश्ताभी नही,’ असे उत्तर मिळाले. त्यामुळे संशय बळावला. घरात राजविंदरच्या आईसह मावशी व भाऊ होते. त्यानंतर 22 तास चौकशी सुरू होती. अखेर पोलिसांनी तुमच्या मुलालाच बेड्या घालतो, असे म्हणत चाल खेळली. त्याला घाबरून आई मायाकौर हिने त्याचा दोष नसून आम्हाला शिक्षा करा, असे सांगत घटना कथन केली. आपले खानदान र्शेष्ठ आणि कट्टरधर्मीय असताना खालच्या जातीतील मुलासोबत लग्न करू नको, असे राजविंदरला सांगूनही तिने ऐकले नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे खानदानच नामशेष करण्याचा कट रचल्याचे कौर यांनी सांगितले. मात्र, त्यापुढे काहीही माहिती दिली नाही. घरच्या फोन कॉल्सनुसार पंजाब कनेक्शन समोर आले. त्यावरून घेतलेल्या लोकेशनने आणखी दोघे कळंबोली स्टेशनवरून पंजाबला जाण्याच्या तयारीत होते. मात्र, तिकिटाला पैसे कमी पडल्याने ते पुन्हा घरी परतणार असल्याचे समजताच पोलिसांनी घराबाहेर सापळा रचून त्यांनाही ताब्यात घेतले. झडतीत गावठी कठ्ठा हाती लागला. पोलिसी खाक्या दाखवताच पंजाबात पळून गेलेल्या चार साथीदारांची नावेही पुढे आली. त्यांनाही पंजाब पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. पण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराशिवाय न्यायालयात गुन्हा सिद्ध होणार नसल्याने पोलिस पुन्हा राजविंदरकडे वळले. मात्र, ती काहीही बोलत नव्हती.
आम्ही तिला ‘तुझ्या आईनेच गुन्ह्याची कबुली दिली आहे,’ असे सांगितल्यावर तिने दोघांच्या प्रेमसंबंधापासून ते विवाहापर्यंतचा प्रवास सांगितला. ‘कुटुंबीयांनी विरोध केल्याने रजिस्टर मॅरेज केले. माहेरच्यांच्या डोक्यात राग कायम होता. डी.एड.चे शिक्षण पूर्ण करून मी शिक्षकेची नोकरी पत्करली. हत्येच्या दिवशी दिराचा वाढदिवस साजरा करून आम्ही सगळे झोपण्याच्या तयारीत होतो. पती, दीर, सासरे टीव्ही बघत होते. त्याचवेळी आई व मावशी घरी आल्या. त्यांनी दागिने, पैशांची मागणी करून मला घरी चलण्याचा आग्रह धरला. पती-सासूने विरोध केल्यावर मावशीने लागलीच खाली मामा, मावसा आल्याचे सांगून बाहेर बोलावले. दिराने जिन्यातून खाली बघितले असता हातात तलवार, सुरा घेऊन ते येत असल्याचे दिसताच त्याने आरडाओरड केल्याने पतीने मला गॅलरीत ढकलले, तोच समोर दिराच्या आणि सासर्‍याच्या मानेवर सुरा फिरवित रक्ताचा सडा पाडला. तोंडातून शब्दही फुटत नसताना सासू व नवर्‍याच्याही डोक्यावर, हाता-पायावर वार केल्याने सुन्न झाले, एकाने मला गॅलरीतून खाली फेकले. काही काळ बेशुद्ध पडल्यानंतर हाताच्या कोपर्‍याने घसरत घसरत मागील बाजूने गोल्डीच्या घरी पोहोचले, त्यानंतर काहीच आठवत नाही.’ असा एक-एक घटनाक्रम उलगडला. ‘उनको फॉँसीही दिलाओ, वो मेरी मॉँही क्यू न हो, उन्हे मेरे यार और सोने जैसे माता-पिता, (सासू-सासरे) भैयाको बेरहमीसे मारा, साहब।’ या शब्दांत तिने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना साकडे घातले.

गुन्हेगारांना फाशी
तीन महिन्यांच्या आत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून अलिबाग जिल्हा जलद न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधीशांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. डिसेंबर 2001 मध्ये न्यायालयाने राजविंदरची आई मायाकौर, मावशी निर्मलाकौर रंधावा यांना जन्मठेप, तर मामा भगवानसिंग रंधावा, कैवलसिंग उर्फ राणा दर्शनसिंग पुल्लर, जगपालसिंग रंधावा, बक्तारसिंग रंधावा यांना फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च् न्यायालय आणि सर्वोच्च् न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली. या तपासाबद्दल साहेबराव पाटील, निरीक्षक आर.पी. शिवरास, सहायक निरीक्षक एस.डी. जगदाळे यांना गौरविण्यात आले.