आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेपरलेस’च्या नादात बीएसएनएलला बिलांचा पडला विसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- संपूर्ण प्रक्रिया अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रशासकीय कारभार ‘पेपरलेस’ करण्याच्या प्रयत्नात बीएसएनएलला लॅँडलाइनची मासिक बिलेच पाठविण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दोन-तीन महिन्यांची बिले एकाच वेळी येऊ लागली आहेत. परिणामी अनेक बिलभरणा केंद्रांवर ग्राहक व कर्मचार्‍यांचे खटके उडत असून, बीएसएनएल प्रशासन मात्र ‘चौकशी करावी लागेल’च्या त्याच झापडबंद सरकारी कामकाजात गर्क असल्याचे वास्तव समोर येत आहे.
बीएसएनएलसारख्या राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक कंपनीने अद्ययावत बनण्याचा भाग म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अपेक्षितच आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होणे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे प्रक्रियेचा त्रास होणे नक्कीच अपेक्षित नाही. मात्र, नाशिक
महानगराच्या विविध भागातील लॅँडलाइनधारकांना असाच प्रत्यय येत आहे. त्यामुळे एकदम बिल येण्याने महिन्याचे बजेट कोलमडल्याच्या संतापाचा उद्रेक बिलभरणा केंद्रांवर घडून येताना दिसत आहे. दरम्यान, काही मोबाईलधारकांकडून बिले अनियमित मिळत असल्याची, तसेच वाढीव येत तक्रार होत आहे.
एसएमएस सेवा अनियमित

ज्या ग्राहकांना कागदावरील बिलांऐवजी एसएमएसद्वारे बिल पाठवले जाते, त्या ग्राहकांनादेखील ही सुविधा नियमितपणे पुरवली जात नसल्याची अनेक ग्राहकांची तक्रार आहे. तसेच मुळात लॅँडलाइन हे हल्ली ज्येष्ठ व्यक्ती किंवा ज्या घरात गृहिणी पूर्णवेळ घरीच असतात, अशाच घरांमध्ये उरले आहेत. त्यामुळे एसएमएसवर बिल सेवेबाबतही पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे ग्राहकांचे मत आहे.
एकवाक्यता नाही

बीएसएनएलसारख्या अब्जावधींची उलाढाल असणार्‍या कंपनीत एकवाक्यता अपेक्षित आहे. निदान थेट ग्राहकांशी निगडित असणार्‍या बाबींमध्ये तरी धोरण असायला हवे. मात्र, बीएसएनएलची बिले जिल्ह्यात काही ठिकाणी पोस्टाने काही ठिकाणी कुरिअरने तर काही ठिकाणी कर्मचार्‍यांमार्फतच वितरित केली जातात. त्यामुळेच कधी बिल महिन्याला पोहोचते तर कधी दोन महिन्यांनी मिळते.