आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - भाजप शहराध्यक्षपदाची निवडणूक होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटण्याची वेळ आली तरी तळाकडील कार्यकारिणी अधांतरीच असल्यामुळे भाजपेयींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराध्यक्षांच्या मते, जुन्या कार्यकारिणीला महिनाभराची मुदत आहे. मात्र, अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, इच्छुकांच्या नावावर एकमत होत नसल्याने कार्यकारिणी रखडली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक होऊन पुन्हा विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांची अविरोध निवड झाली. मात्र, यंदा प्रथमच शहराध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष विजय साने, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास फरांदे यांच्यासह चौघांनी दावेदारी सांगितल्याने निवड चुरशीची बनली होती. अखेरीस निवडणूक अधिकार्यांनाही निर्णय घेणे अडचणीचे ठरले असताना थेट राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधून शहराध्यक्ष सावजी यांची निवड जाहीर करावी लागली होती. या निवडीनंतर लागलीच झालेल्या सत्कार सोहळ्यासदेखील इच्छुकांसह पदाधिकार्यांनी काढता पाय घेत उघडपणे नाराजी दर्शविली होती. मात्र, त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन पक्षबळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सावजी यांनी सांगितले होते. त्याच वेळी काही पदाधिकार्यांनी जाहीरपणे येत्या काळात पक्षाकडून जनहितासाठी रस्त्यावर उतरून अांदोलने करण्यात येतील, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला नामोहरम केले जाईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली. या आंदोलनांसाठी शहराध्यक्षांना सक्षम अशी कार्यकारिणी निवडण्याचे आव्हान असून, त्याच्या बळावरच पक्ष वाटचाल करू शकतो. या पार्श्वभूमीवर इच्छुक पदाधिकार्यांकडून कार्यकारिणीची प्रतीक्षा केली जात आहे. सरचिटणीस, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.
पक्षाची एकूण 60 जणांची कार्यकारिणी असते. त्यातच इतर आघाड्यादेखील नावालाच उरल्या असून, त्यांच्याही अध्यक्ष, उपाध्यक्षांची पदे जाहीर झालेली नाहीत. दरम्यान, नूतन कार्यकारिणी निवडताना केवळ शहराध्यक्षांचा सर्मथक असणार्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तवित काही नावांवर एकमत होत नसल्यचाही आरोप केला जात आहे. तर काही पदाधिकार्यांकडून प्रदेशपातळीवर अध्यक्षपदाचा वाद मिटल्यानंतरच स्थानिक कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो, असेही मत व्यक्त केले जात आहे. कार्यकारिणी नसल्यामुळेच पक्षात शांतता असून, मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अपवाद वगळता कुठलेही आंदोलन झाले नसल्याचेही बोलले जात आहे.
महिनाभरात नूतन कार्यकारिणी
मागील कार्यकारिणीची मुदत 3 मेपर्यंत असून, केवळ शहराध्यक्षपदाची निवडणूक दोन महिने अगोदर झाली आहे. त्यामुळे नूतन कार्यकारिणी लागलीच जाहीर करणे अपेक्षित नाही. नूतन कार्यकारिणी या महिनाभरात जाहीर करण्यात येईल. लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.