आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्य नोंदणीचा मुद्दा, जुन्या भाजपेयींना गुद्दा - दानवेंच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेत इतर पक्षांतून आलेल्या नवीन कार्यकर्त्यांनी काही दिवसांत पाच हजारपेक्षा अधिक सदस्य नोंदवले, मात्र पक्षातील जुन्यांना ते लक्ष्य पूर्ण करता आलेले नाही. त्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी जुना-नवा वाद उकरता जोमाने काम करावे, असा सल्ला देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी झाडाझडती घेतली. शहरात सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट गाठता येण्याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.

उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात शनिवारी भाजपच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार सुभाष देवरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, संघटनमंत्री रमेश भुसारे, सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रा. सुहास फरांदे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, सुनील बागुल, सतीश कुलकर्णी, सुनील आडके उपस्थित होते.

दानवे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, भाजपचे काम नाशिक शहरात चांगले आहे; मात्र जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची जुनी परंपरा आजही कायम असून, नाशिकमध्ये एकमेव आमदार असताना सदस्य नोंदणीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. मात्र, आमदारांची संख्या तीन झाल्याने आता हे उद्दिष्ट पूर्ण हाेईल, याची खात्री वाटत नाही. जिल्ह्यात आणखी तीन आमदार निवडून येऊ शकले असते, मात्र दगाफटका झाल्याने त्यांचा पराभव झाल्याची कबुली देताना नाशिक भाजपची ‘बर्म्युडा’ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याची ताकद निर्माण करण्यासाठी पक्षाने महाराष्ट्राला दिलेले एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेण्यास सांगितले. लाेकसभा, विधानसभा निवडणुका जिंकलो असलो तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. पाया मजबूत होत नाही ताेपर्यंत स्वबळावर सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यासाठी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. येत्या पंधरवड्यात सर्व यंत्रणा कामाला लागली पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले.

दानवे पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. त्यासाठी देशभरातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांत पाच हजारपेक्षा अधिक सदस्य नोंदणी केल्याने त्यांचा सत्काराला टाळ्या वाजत आहेत, मात्र पक्षातील जुन्यांना लक्ष्य पूर्ण करता आलेले नाही. यासाठी नव्याच्या सत्काराला टाळ्या पडतात, तशा आपल्यासाठी टाळ्या पडल्या पाहिजे, असे काम करा. नव्यांना समजून घेऊन आपल्यात सहभागी करून घ्या. पक्षाच्या सक्रिय सदस्याला सत्तेत सहभाग देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकारी जर कार्यकर्त्यांचे ऐकत नसतील तर मंत्र्यांना सांगा, मंत्री ऐकत नसतील तर पक्षाला सांगा, योग्य ती कारवाई पक्ष करेल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

मेळाव्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. सदस्य नोंदणीतील आघाडी घेतलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी सदस्य नोंदणीचा आढावा सादर केला. प्रास्ताविकात लक्ष्मण सावजी यांनी भाजप कार्यकर्त्यांमुळे लोकसभेत शिवसेना यशस्वी झाल्याचे सांगून शहरात पाच लाख सदस्य नोंदणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे शंभर प्लस असे लक्ष्य ठेवून बूथरचना करण्यात येत असल्याचे सांगितले.

होदी शैलीत घेतला वादाचा समाचार
इतरपक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने पक्षात जुने-नवीन असा वाद निर्माण होत आहे. याचा विनोदी शैलीत समाचार घेताना दानवे म्हणाले की, नवीन येणा-यांनी कौतुकास्पद सभासद नोंदणी केली. तुलनेत जुने मागे आहेत. लग्नासाठी गो-या सावळ्या रंगाच्या दोन मुली आवडल्यानंतर कोणीही गो-या मुलीचीच निवड करेन, मात्र तिला मुलं होणार नसल्याचे समजल्यावर सावळ्या मुलीची निवड होईल. यासाठी जुन्यांनी वाद घालू नये.

पक्षाचा निर्णय अंतिम
ग्रामपंचायतसदस्य, पंचायत समिती सदस्य, तीन वेळा आमदार, चार वेळा खासदार झालो. गाव, तालुका, प्रदेश, राष्ट्रीय कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ३७ वर्षांनंतर मंत्रिपद मिळाल्यानंतर म्हतारपणात मूल व्हावे इतका आनंद झाला. मात्र, काही दिवसांत पार्टीने मला पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून पुन्हा गावाकडे जाण्याचा आदेश दिला. मी आनंदाने जबाबदारी स्वीकारली, कारण पार्टीचा निर्णय अंतिम आहे.