आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिटको रुग्णालयात रुग्णांनी केला राडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - वडनेरदुमाला येथे मारामारीत जखमी झालेले दोघे वैद्यकीय तपासणीसाठी बिटको रुग्णालयात आले असता, या दोघांमध्ये व त्यांच्या सर्मथकांमध्ये तुफान मारामारी झाली. यात बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन लोकवाणी यांच्यासह शिकाऊ डॉक्टर व कर्मचारी जखमी झाले असून, रुग्णालयातील खुच्र्या, टेबलांची फेकाफेक करून मोठे नुकसान केल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

या गंभीर घटनेनंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षकांसह वरिष्ठांना वारंवार फोन करूनदेखील कोणीच फोन उचलला नाही. वडनेरदुमाला येथे घरगुती वादातून झालेल्या मारामारीतील जखमी अर्जुन केरू पोरजे व दत्तात्रय अर्जुन पोरजे हे उपनगर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी बिटको रुग्णालयात पाठविले. दोघे एकाचवेळी रुग्णालयात आले असता त्यांचे सर्मथक, विरोधकही तेथे आले व त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन लोकवाणी यांच्यासमोरील खुच्र्या उचलून एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात डॉ. कांचन लोकवाणी, शिकाऊ डॉक्टर व कर्मचारी जखमी झाले. क्षणात दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ झाली. जखमी शिकाऊ डॉक्टरवर उपचार करून त्यांना कर्मचार्‍यांसमवेत घरी सोडण्यात आले. या मारामारीत अर्जुन पोरजे, दत्तात्रय पोरजे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा मारामारी होण्याच्या भीतीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याची परवानगी मागितल्याचे डॉ. लोकवाणी यांनी सांगितले, तर प्रतिस्पर्धी तुकाराम पोरजे व त्यांच्या दोन नातेवाईकांची हाणामारीत प्रमुख भूमिका होती. त्यापैकी तुकाराम पोरजे किरकोळ जखमी झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महर्षी, प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

सुरक्षारक्षक स्तब्ध : रुग्णालयामध्ये खासगी सुरक्षारक्षकांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतली होती. अखेर जखमी अवस्थेत डॉ. लोकवाणी यांनी धाडस करून मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचे उद्धट वर्तन

वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकवाणी यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फोन करून दोघांना एकत्र का पाठविले, अशी विचारणा केली असता, तेथील ठाणे अंमलदारांनी उद्धट वर्तन करून अपशब्द वापरल्याचा आरोप डॉ. लोकवाणी यांनी केला. याआधीही उपनगर पोलिसांकडून अशी उद्धट वागणूक रुग्णालय कर्मचार्‍यांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


डॉक्टरांची आज बैठक
घटना घडल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ अधिकार्‍यांनी साधा फोनसुद्धा घेतला नाही. सोमवारी (दि. 8) रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचार्‍यांची याबाबत बैठक होणार आहे. डॉ. कांचन लोकवाणी, वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय