आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिलासाठी रुग्ण ‘नजरकैदेत’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पाच लाखाचे बिल मिळत नसल्याने एका रुग्णाला तब्बल दीड महिन्यापासून वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘नजरकैदे’त ठेवल्याचा आक्षेप घेत संतप्त जमावाने तेथे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला. पोलिस यंत्रणेने हस्तक्षेप करत जमावाला शांत करून रुग्णाला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

रघुनाथ मुर्तडक (क्रांतिनगर, मखमलाबाद रोड) यांनी मार्चमध्ये मुलगा हितेश यास न्यूमोनिया झाल्याने नाशिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्याने वोक्हार्टमध्ये 19 मार्च 2013 मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यावेळी दोन-अडीच लाख रु. खर्चाचा अंदाज दिला. प्रत्यक्षात सुमारे साडेनऊ लाख रु. बिल झाले. त्यातील साडेचार लाख मुर्तडक यांनी भरले. उर्वरित पाच लाखांसाठी व्यवस्थापनाने हितेशला (डिस्चार्ज तारखेनंतर) दीड महिन्यापासून हॉस्पिटलमध्येच ठेवल्याचे मुर्तडक यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. याची माहिती मिळताच काँग्रेसच्या जयर्शी नगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन यास आक्षेप घेतला.

7 जूनलाच डिस्चार्ज : यासंदर्भात वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले की, मुर्तडक खोटे आरोप करीत असून बिल दहा लाख नव्हे, तर केवळ पाच लाख 38 हजार 393 रुपये झाले असून, त्यापैकी एक लाख 10 हजार 900 रुपये नातेवाइकांनी जमा केल्याचे कळवले आहे. 7 जूनलाच हितेशला डिस्चार्ज दिला होता. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थांबवले, डांबून ठेवले नाही. डिस्चार्जबाबत भद्रकाली पोलिस ठाण्याला सूचना केली होती.

कोरा चेक आणा
मुलाचा जीव वाचवायचा असेल तर मुंबईहून डॉक्टर बोलवावे लागतील. त्यासाठी कोरा चेक आणा, असे डॉक्टरांनी सांगितले. कोरा चेक घेऊन आलो. त्यानंतर बिल कमी करायचे असल्याचे सांगून एका कोर्‍या कागदावर बळजबरीने सही घेतली. रघुनाथ मुर्तडक, रुग्णाचे वडील

पैसे कोठून आणायचे?
बिलासाठी आई व बहिणीचे दागिने मोडले. रिक्षा विकून, नातेवाइकांकडून पैसे उसने घेऊन आतापर्यंत सुमारे साडेचार लाखांचे बिल भरले आहे. तीन महिन्यांपासून वडीलही माझ्या आजारपणामुळे घरीच आहेत. आणखी पैसे आणायचे कोठून? हितेश मुर्तडक, रुग्ण

समेट घडवला
रुग्णालय व्यवस्थापन व रुग्णाच्या नातेवाइकांत समेट घडवून आणला आहे. आता हितेशला नातेवाइकांच्या ताब्यात दिले असून, बिलासंदर्भात नंतर चर्चा होणार आहे. कोरा चेकही परत करायला लावला आहे. नातेवाइकांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल. रमेश पाटील, पोलिस निरीक्षक