आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृषार्त मोराचा रेल्वे इंजिनमध्ये होरपळून अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड / लासलगाव- गुरुवारी सकाळी 6.30 वाजता लासलगाव स्थानकात पंचवटी एक्स्प्रेस येत असताना पाण्यासाठी भटकंती करत स्थानकावर आलेल्या मोराचा या रेल्वे गाडीच्या इंजिनच्या पेंटोग्राफमध्ये अडकल्याने जळून मृत्यू झाला. यामुळे लासलगाव स्थानकावर पंचवटी एक्स्प्रेस सुमारे 40 मिनिटे थांबून होती. मोराचा होरपळून मृत्यू झाल्याने प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. यानंतर गाडी रवाना झाली तेव्हा गाडीत प्रवाशांमध्ये या घटनेबद्दल चर्चा सुरू होती. दरम्यान, नाशिकरोड स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे सकाळी 7.45 वाजता आगमन झाले.

लासलगाव रेल्वे स्थानकात पाण्याच्या शोधार्थ हा मोर आला होता. त्याच वेळी स्थानकावर सकाळी 6.30 वाजता पंचवटी एक्स्प्रेसचे आगमन होत होते. या रेल्वेच्या इंजिनच्या पेंटोग्राफमध्ये हा मोर अचानक अडकला. पेंटोग्राफमध्ये अडकल्याने सदर मोराचा जळून मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी वासुदेव सरोदे यांनी तातडीने या मृत मोराला पेंटोग्राफमधून बाहेर काढले. पक्षीमित्र बाबा गिते, प्रमोद महानुभाव यांनी या घटनेची माहिती वनरक्षक पी. पी. सोमवंशी यांना दिली. सोमवंशी यांनी मृत मोरास ताब्यात घेतले व पाचोरे येथे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी उत्तरीय तपासणी करून त्यास दफन केले.

टाकळी विंचूर परिसरात मोर : रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस टाकळी विंचूर गावात 25-30 मोर पाहायला मिळतात. तेथे मोरांकरिता वनविभागाने पाण्याची कुठलीही सोय केलेली नसल्यामुळे ते मोर गावाकडे येतात. तसाच प्रकार आज मृत झालेल्या मोराच्या बाबतीत घडला आहे. मोर पाण्याच्या शोधात थेट रेल्वे स्थानकापर्यंत आला आणि त्याला प्राण गमवावा लागला.

वनविभागाने तळे बांधावे
टाकळी विंचूर येथे मोर मोठय़ा संख्येने असल्याने तातडीने त्यांना पिण्याचे पाणी मिळण्याकरिता वनविभागाने तेथे तळे बांधण्याची गरज आहे. आज तेथे पाण्याचे तळे असते, तर मोराला आपला जीव गमवावा लागला नसता.
-बाबा गिते, पक्षीमित्र

मुंबईतही पोहोचली उशिराने
पंचवटी एक्स्प्रेसचे नाशिकरोड स्थानकात रोज सकाळी 7.05 वाजता आगमन होत असते. मात्र, लासलगाव स्थानकावरील मोराच्या मृत्यूच्या घटनेने ही रेल्वे त्याठिकाणी 40 मिनिटे थांबली. नाशिकरोडलाही तिचे उशिराने सकाळी 7.45 वाजता आगमन झाले. एरवी या रेल्वेगाडीला उशीर झाल्यास प्रवासी संताप व्यक्त करतात. मात्र, मोराचा होरपळून मृत्यू झाल्याने त्याबाबत हळहळ व्यक्त होत होती. येथून मुंबईकडे ही गाडी रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकात ही गाडी तासभर उशिराने पोहोचली. एरवी नाशिकरोडहून रेल्वे सुटण्यास उशीर झाल्यास तो प्रवासादरम्यान भरून काढून वेळेतच दादर स्थानकात पंचवटी एक्स्प्रेस पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. गुरुवारी मात्र तसा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. परिणामी ही गाडी तासभर उशिरा दादर स्थानकात पोहोचली.

पाण्याची व्यवस्था करू
विंचूर परिसरात वनविभागाच्या पाहणीत मोरांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळली आहे. सध्या टंचाइची स्थिती असल्याने या परिसरातील मोर पाण्यासाठी भटकंती करतात. त्यासाठी या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल.
-पी. व्ही. जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला