आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यासाठी ‘शोले स्टाइल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा - तालुक्यातील करंजाड व भुयाणे येथील युवा शेतकर्‍यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोबाइल टॉवरवर रॉकेलच्या कॅनसह चढून सुमारे साडेचार तास शोले स्टाइल आंदोलन केले.

करंजाड-भुयाणे येथील 150 ते 200 शेतकर्‍यांचा रस्त्याचा प्रश्न गत दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात संबंधित शेतकर्‍यांनी अनेक वेळा प्रांत, तहसील कार्यालयाकडे तक्रारी केल्या. ग्रामसभेतही या विषयावर करंजाड- भुयाणे शिवपांदी रस्त्यासंदर्भात बर्‍याचदा चर्चाही झाली. 1 मे 2012 रोजीच्या ग्रामसभेत सदर रस्त्यांसंदर्भात सर्वानुमते निर्णयही झाला होता. पण या ठरावाला अडीच महिने होऊनही समस्या ‘जैसे थे’च. मुलांना शाळेत जाता न येणे, शेतमाल बाहेर नेण्यास अडचण येणे अशा समस्या व त्यातून तंटे निर्माण होणे हे नियमित सुरू असल्यामुळे शेतकर्‍यांनी 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा 9 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीला दिला होता. ग्रामसेवक पी. आर. पाटील यांनी याबाबतच्या निवेदनाची प्रत तहसीलदारांना दिली हेती.

परंतु, प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने व ग्रामसभेतही निर्णय होऊनही प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी काहींनी विरोध केल्याने शेतकरी मोबाइल टॉवरजवळ जमले. त्यातील सुनील देवरे, काकाजी देवरे, प्रदीप अहिरे, भूषण पंडित देवरे, भूषण रावबा देवरे हे रॉकेलची कॅन घेऊन सरळ मोबाइल टॉवरवर चढले व उर्वरित शेतकरी सहकुटुंब टॉवरखाली उपोषणास बसले. 11.30 वाजता सुरू असलेले आंदोलन 4 वाजेपर्यंत सुरू होते. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांनी उपविभागीय अधिकारी भीमराव शिंदे यांच्याशी चर्चा करून आंदोलकांना टॉवरवरून खाली उतरविले.
पोलिस प्रशासन उदासीन - उपविभागीय पोलिस अधिकारी प्रज्ञा जेडगे यांना आंदोलनासंदर्भातील परिस्थिती कळवली असता त्यांनी रस्त्याचा प्रश्न पोलिस प्रशासन सोडवू शकत नसल्याचे सांगून जिल्हाधिकार्‍यांना फोन करण्याचे सूचित केले.
प्रशासनाने निर्णय घ्यावा - गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता समस्येसंदर्भातील प्रकरण आज-उद्यावर ढकलण्याचे काम चालले आहे. प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. अभिजित देवरे, शेतकरी
दोन दिवसांत बैठक - 415 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा करंजाड येथे जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत उपविभागीय अधिकारी भीमराव शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. यात योग्य निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढला जाईल. कैलास पवार, तहसीलदार, सटाणा