आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात १५ मजली इमारतींना परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात१५ मजल्यापर्यंत उंच इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून, २२ वर्षांपूर्वीच्या, १९९३ च्या विकास नियंत्रण नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला राज्य शासनानेे हिरवा कंदील दाखवला आहे. पार्किंग, टेरेस अन्य काही बाबींबाबतही सवलती दिल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उंच इमारतींचे बांधकाम करताना येणा-या जाचक अटी दूर करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेचा पाठपुरावा सुरू होता. नियमावली बदलासाठी २०११ मध्ये महापालिकेने महासभेत ठराव करून शासनाकडे पाठविला होता. मात्र, शासनाकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या आशाही मावळल्या होत्या. आता प्रस्ताव मंजूर झाल्याने १५ मजली इमारतीचे बांधकाम करता येईल. तसेच, ‘रेफ्यूजी फ्लोअर्स’ऐवजी ‘रेफ्यूजी स्पेस’ असा शब्दप्रयोग केल्यामुळे आठ मजल्यापर्यंत इमारतीचे बांधकाम करता येईल.

पूर्वी टेरेसला परवानगी मिळत नव्हती. आता १.८ मीटर लांबीचा टेरेस ‘प्रीमियम’ भरून बांधता येईल. पूर्वी इमारतीला एकच बेसमेंटसाठी परवानगी होती. आता दोन बेसमेंटला परवानगी मिळेल. ४० मीटर ऐवजी आता ४५ मीटर उंच इमारतीची परवानगी असेल. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार्किंगला परवानगी दिल्याने आता पार्किंगचा प्रश्नही मिटणार आहे.