आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना भिकारी बनवून लाखोंची कमाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लहान मुलांना भीक मागण्यास भाग पाडून लाखो रुपयांची कमाई करणार्‍या नाशिकरोड परिसरातील स्वयंसिद्धम आश्रमाचा संचालक अनिल बाविस्कर याला सुरत पोलिसांनी अटक केली आहे.

सुरतमधील उमरा पोलिस ठाण्यात बाविस्कर (वय 49, रा. हॉटेल वासवाणीसमोर, चौधरी बिल्डर कॉलनी, नाशिकरोड) याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाविस्कर सात लहान मुलांना सोबत घेऊन सुरतमधील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्‍या पार्ले पॉइंट अंबिका निकेतन मंदिरात आला होता. या मंदिरासमोर नाशिकरोडमधील स्वयंसिद्ध आश्रमातील 55 लहान मुलांना खाण्या-पिण्यासाठी काहीच नाही, असा बहाणा करत त्याने या मुलांना भीक मागण्यासाठी भाग पाडले होते. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या मंजुलता जैन या पतीसोबत मंदिरात आल्या असता मेहता स्कूलचा गणवेश घातलेली मुले भीक मागताना बघून त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी तातडीने उमरा पोलिस आणि समाजसुधार शाखेच्या कर्मचार्‍यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता बाविस्कर हा जबरदस्तीने मुलांकडून आश्रमाच्या नावाने भीक मागून घेत असल्याचा आणि त्यांचा छळ करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बाविस्कर अशाच प्रकारे गुजरातमध्ये ठिकठिकाणी या मुलांना घेऊन पैसे गोळा करीत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला.

दरम्यान, या मंदिरात येणारे बहुतेक भाविक हे श्रीमंत असल्याने बाविस्कर यांनी मुलांकडून भिकेपोटी लाखो रुपये मिळविल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.