आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांचे पारणे फेडणारा देशी-विदेशी प्राणी, पक्ष्यांचा मेळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुबगुबीत,टपोऱ्या डोळ्यांच्या मांजरी... क्षणभर भीती आणि नंतर आकर्षण वाटावे असे श्वान, रुबाबदार-तुकतुकीत घाेडे, दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या हॅम्सटर्ससह अवघ्या बालगोपाळांसाठी लक्षवेधी ठरलेल्या मकावू, कोकाटू टर्की या विदेशी पक्ष्यांचा मेळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
नाशिक केनिन क्लब आणि पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (िद. १३) पाळीव प्राण्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ३८० प्राण्यांचा सहभाग होता. कुत्र्यांचे विविध प्रकार, घोडे, मांजरी, हॅम्सटर्ससारखे अनोखे प्राणीही लक्षवेधी ठरले. आपल्याला काही मोजके प्राणीच माहीत असतात. मात्र, पाळीव प्राण्यांमध्येदेखील अगदी उंदरांपासून पक्ष्यांपर्यंत सर्वांचाच समावेश होतो, याची अनुभूती नाशिककरांना या मेळ्याद्वारे घेतली. या पेट शोचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात २८० प्रकारचे श्वान पाहायला मिळाले. तसेच, ६० मांजरी ४० घोड्यांचाही यात समावेश होता. याव्यतिरिक्त शहरातील हॅम्सटर्स, इग्वाना, जावा स्पॅरो, शुगर ग्लाइडर आणि स्वित्झर्लंडचे न्यू फाउंडलँड हे भव्य पाळीव श्वानही या शोचे प्रमुख आकर्षण ठरले.
या उपक्रमातील स्पर्धेचे परीक्षण डॉ. श्रीरंग दर्प, नितीन टेंबे, केतन जोशी यांनी केले. शिवाय, अॅनिमल वेल्फेअर अँड अँटी हॅरॅसमेंट सोसायटी, अवियन सोसायटी ऑफ इंडिया, संजीवन आणि पेट लव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनीही उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. या अनोख्या मेळ्यासाठी नाशिककर प्राणी-पक्षीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत हा शो सुरू होता.
डौलदारबांध्याची जिवा-शिवाची बैलजोडीही ठरली केंद्रबिंदू : उपक्रमातकेवळ श्वान, मांजरीच नव्हे तर रुबाबदार बैलजोडीदेखील तोऱ्यात उभी होती. चकचकीत पांढऱ्या रंगाची, डौलदार बांध्याची, दिमाखदार शिंगांची ही बैलजोडीही शोचे खरे केंद्रबिंदू ठरली. याचबरोबर सानप डेअरीच्या मालकीचा भला मोठा रेडा पाहून नागरिकांना कौतुकही वाटत होते आणि आश्चर्यही.

पोलिस अकादमी अश्व शाळेतील घोड्यांचा असाही दिमाख : नाशिकच्यामहाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अश्वांचा दिमाख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. अतिशय शिस्तीचे हयात, चेतक, सारंग आणि गुफी हे घोडे सर्वच घोड्यांना जणू शिस्त आणि आदबीने वागण्याची शिकवण मिळाल्याचे यात दिसले.

सरड्याच्या आकर्षक जाती : इग्वानाआणि शॅमेलिऑन सरड्याच्या आकर्षक प्रकारांनी लहान मुलांना भुरळ घातली होती. मुलांना सरड्याला हात लावण्याची मजा यानिमित्ताने अनुभवता आली.
गिनीपिग उंदीर अाणि सशाची संकरित जात

आकर्षक तितक्याच बहुमूल्यही
पर्शियन मांजर ही मूळ आफ्रिकेतील आहे. त्यात पंचफेस पर्शियन आणि राउंड फेस पर्शियन कॅट हे दोन प्रकार दिसून येतात. त्यानुसारच त्यांच्या किमतीदेखील कमी-अधिक होत असतात. काळा, शुभ्र पांढरा करडा असे तीन रंग या मांजरींमध्ये आढळतात. शक्यतो या मांजरी निळ्या डोळ्यांच्या असतात.

ग्रेट डन, ग्रे हाँट, पिटबूल, रॉटविलर, लासा, डॅशहट, बिगल, सेंट बर्नार्ड, हस्की, टॉय फॉक्स टेरियर, शित्झू, अमेरिकन पिटबूल टेरिअर, मश्चिफ या जातीचे तिबेटियन, नेपोलियन, फ्रेंच कुत्रे, रफ कॉली नावाचा देखणा कुत्रा, मिनी पॉम असे नवनवे कधीही ऐकलेले प्रकार पेट टुगेदरमध्ये पाहायला मिळाले. शिवाय डॉबरमन, गोल्डन रिट्रिव्हर, पग, बुलडॉग असे नेहमीचे प्रकारही यात होते.

कृत्रिम पायाच्या खेचराचे आकर्षण
अॅनिमल वेल्फेअर अँड अँटी हॅरॅसमेंट साेसायटी (अावास) संस्थेला सहा महिन्यांपूर्वी पाय तुटलेल्या अवस्थेतील हा डुलडुल अर्थात ‌खेचर बेवारस अवस्थेत सापडला होता. तब्बल पाच महिन्यांच्या उपचारानंतर बऱ्या झालेल्या या खेचराला अनामिक हॅण्डीकॅप फुटवेअरच्या सहकार्याने यशस्वीपणे कृत्रिम पाय बसविण्यात आला. या शोमध्ये दिमाखात सहभागी झालेला हा खेचरदेखील प्राणीप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरला होता.

विदेशी चिवचिवाट आणि हरखलेली बच्चेकंपनी
पेट शोमध्ये परदेशातील अनेक पक्षी पाहावयास मिळाले. ज्यामध्ये चायनीज फिसंट, जावा स्पॅरो, रेनबो फिंच, डायमंड डव्ह, जावा फिंच, कॉकटेल, कॉनूर, मकाऊ, कोकाटू, टर्की या विदेशी पक्षांसह बदक, कडकनाथ, इमूच्या पिलांचाही समावेश होता. जे बालगोपाळांचे खास आकर्षण ठरत होते.
बातम्या आणखी आहेत...