नाशिक - जळगावचे निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलिस अधिक्षकांचे नाव लिहीले आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका आठवड्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलिस दलाला चांगलाच हादरा बसला आहे. वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चक्क सोने व किंमती वस्तू भेट म्हणून मागत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस दलातील वरिष्ठांचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
चांगली पोस्टींग मिळावी यासाठी पोलिस दलाल कशी दलाली सुरू असते याचा भांडाफोडही त्यांनी चिठ्ठीत केला आहे. पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर व गुन्हे शाखेचे निरिक्षक प्रभाकर रायते यांची तोडपाणी त्यांनी उघड केल्याने खळबळ उडाली आहे. एक वर्षाच्या कालावधीत दिलेल्या त्रासास कंटाळून जीवन संपवत आहे. पोलिस महासंचालकांनी या प्रकाराची चौकशी करावी व असे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी कठोर पावले उचलावीत, ही मरणापूर्वीची शेवटची इच्छा त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे. शेवटी "जयहिंद' लिहून त्यांनी निरोप घेतला.
काय आहे प्रकरण
जळगावच्या रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी काल त्यांच्या नाशिकमधील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या जाचाला कंटाळून
आपण आत्महत्या केल्याचे सादरे यांच्या सुसाईड नोटमधून समोर आले आहे.
मित्राला पाठवली चिठ्ठी
अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ही चिठ्ठी त्यांनी लिहून ती आपल्या मित्रांनाच पाठवली होती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. प्रामाणिकपणे काम करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैशांसाठी आपल्याला कसे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुंतविले. याचा नमुनाच त्यांनी चिठ्ठीत सादर केला आहे. या चिठ्ठीने पोलिस दलात सुरू असलेला भ्रष्टाचार समोर आला आहे.
जालिंदर सुपेकर यांनी सर्व आरोप फेटाळले
भ्रष्टाचाराच्या बातम्या मीडियामध्ये आल्या पण कारवाई झाली नाही. अशा अपप्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी मी एकाकी पडलो, त्यामुळे जीवन संपवत आहे, असेही त्यंानी लिहीले. सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी सर्व आरोप फेटाळले असून चौकशीला तयार असल्याचे म्हटले आहे. या सगळ्या प्रकारावर पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि सखोल चौकशीची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी..