आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायोग्लिटाझोन औषधांवर बंदी; मधुमेही आता नव्या औषधांच्या शोधात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रक्तशर्करेवर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार्‍या पायोग्लिडाझोन आणि त्याच्या घटकांचे मिश्रण असलेल्या औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने मधुमेहींना जाच सहन करावा लागणार आहे. वर्षानुवर्षे ही औषधे मधुमेहींकडून वापरली जात असून, बंदीमुळे आता पर्यायी औषधे कोणती ते शोधण्याची डोकेफोड डॉक्टर आणि केमिस्टला करावी लागणार आहे. रुग्णांकडूनही नवीन औषधांच्या खरेदीकरिता राजी होणे जिकिरीचे होणार आहे.

या औषधांपासून मानवी शरीरास धोका उत्पन्न होऊ शकतो आणि औषधाकरिताचे पर्याय बाजारात उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने 18 जून रोजी काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. या अध्यादेशानुसार या औषधांचे उत्पादन, वितरण, विक्रीवर बंदी आली असून, उत्पादक कंपन्यांनीही बाजारातील साठा परत बोलावला आहे. यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत ही औषधे बाजारातून गायब होणार आहेत. सध्या किरकोळ औषध विक्रेत्यांकडे ही औषधे उपलब्ध असून, ठोक विक्रेत्यांनी विक्री थांबविली आहे.

मधुमेहग्रस्तांना वर्षानुवर्षे या औषधांची सवय झालेली आहे. तसेच, पर्यायी औषधे नेमकी कोणती, याबाबत परिपूर्ण माहिती नसल्याने मधुमेहग्रस्तांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनाही नेमके औषध शोधावे लागणार असल्याने एकंदरीतच मधुमेहग्रस्त ते त्यावर उपचार करणारे वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेते या सर्व घटकांपुढे गहण प्रश्न उभा ठाकला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे मिळते या औषधांना पसंती : जाणकारांच्या मते तिसर्‍या टप्प्यातील मधुमेहाकरिता पायोग्लिडाझोन आणि घटक असलेल्या औषधांचा वापर किंवा इन्सुलीन यांचा पर्याय रुग्णासमोर असल्याने रुग्ण आणि डॉक्टर दोहोंकडून इन्सुलीनऐवजी ही औषधे घेण्याबाबत सुचविले जाते. कित्येक वर्षं ही औषधे बाजारात उपलब्ध असून, रुग्णांकडूनही त्याचीच मागणी असते. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशाने या औषधांवर बंदी आल्याने त्याला पर्याय शोधण्यात येत आहे.

या औषधांवर बंदी
पायोग्लिडाझोन, पायोग्लेयर (7.5 ,15 आणि 30 मिलिग्रॅम), पायोग्लेयर-एमएफ ( 7.5 +500 मिलिग्रॅम, 15 + 500 मिलिग्रॅम, 30 + 500 मिलिग्रॅम), पायोग्लेयर जी, जीएफ, रायोमेट - ट्रायो वन आणि टू) या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

विक्री थांबवलीय
ठोक विक्रेत्यांनी या औषधांची विक्री थांबवली आहे, तर किरकोळ विक्रेत्यांकडील औषधेही चार-पाच दिवसांत संपतील. केंद्र सरकारने पर्याय असल्याचे म्हटले असले तरी हे पर्याय कोणते ते शोधावे लागणार, याबाबत डॉक्टर आणि केमिस्ट संभ्रमात आहेत. रुग्णांचे हाल होऊ नयेत, याकरिता प्रयत्न करीत आहोत. गोरख चौधरी, नाशिक जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन