आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंचला जाणिवेचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रकार अनेक असतात, देशविदेशात नावही कमावतात. अनेक जण तर पैसाही कमावतात, पण त्यातून सामािजक जाणिवांची संवेदना जपणारा दुर्मिळच. अशीच एक चित्रवेडी सखी दीप्ती कुलकर्णी. महिलांच्या संवेदना तिने रंगरेखांतून उमटवत तिच्या या स्मार्ट आर्टनेे थेट सातासमुद्रापारही वाहवा मिळवली.

समाजात अनेकींना खूप बोलायचे असते. पण, अन्यायग्रस्ततेने त्यांचे माैन कायम असते. अशा माैनाचे भाषांतर करत त्यांच्या वेदना, संवेदना रेखाटताना दीप्ती कुलकर्णी अजिबात थकत नाही. ती त्यावर भरभरून बोलते आणि महिलाच नाही तर समाजाला उपयोगी अशी चित्रेच बरंच काही शिकवून जातील, असाही तिचा ठाम विश्वास व्यक्त करते. नाशिकची ही कलाकार अमेरिकेतील न्यू जर्सीत मल्टीनॅशनल साॅफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. मात्र, तिने आपली ही स्मार्ट आर्ट जतन केली आहे. ती २०१२मध्ये नाशिकमध्ये आली होती. तेव्हा आपल्याकडे निर्भया प्रकरणावर लोकं आंदोलन करत होते. यातूनच तिने प्रेरणा घेत महिलांचं सुख-दु:ख अधाेरेखित करायचं ठरवलं आणि तिच्या कुंचल्यातून स्त्रीचं वास्तव उमटत गेलं. मुळातच हुशार असलेली दीप्ती शाळेतच या कलेचे धडे गिरवत हा ेती. अभ्यासातही मेरिटमध्ये, चित्रकलेत ‘अ’ श्रेणी असा तिचा ग्राफ उंचावत होता. तिला चित्रकलेचे बाळकडू मिळाले ते तिची आई वासंती कुलकर्णी यांच्याकडून. त्यादेखील ऑईल पेंटिंग करतात. दीप्तीने तोच धडा गिरवता ती मात्र अॅक्रॅलिककडे वळली. अॅक्रॅलिक ऑन हॅण्डीक्राफ्ट हा तिचा विषय. हॅण्डीक्राफ्ट पेपरच्या टेक्चर इफेक्टचा ती आपल्या चित्रांमध्ये वापर करते. ती त्याच्यासाठी व्हायब्रंट कलर्स, ब्राईट कलर्स वापरते. त्यामुळे चित्र जिवंतच होते.
म्हणूनच तिच्या चित्रांना विशेष पसंती आहे. नुकतेच तिच्या याच चित्रांचे न्यू जर्सीत प्रदर्शन झाले. तीन दिवसांची मर्यादा असलेले हे प्रदर्शन उत्कृष्ट चित्रांमुळे त्या संस्थेने आठ दिवस सुरूच ठेवले. त्यामुळे प्रोत्साहन मिळाल्याने आता विविध सामािजक मुद्दे आणि पर्यटन हा विषय तिच्या चित्रांतून दिसणार आहे. चित्रकलेत काय नवीन घडतं आहे, याकडे ती िवशेष लक्ष देऊन असते. जे काही नवीन असेल ते आपल्याला आलंच पाहिजे या वृत्तीने ती त्याचा ध्यास घेते आणि कृतीतही उतरवते. ती कोणत्याही घटनेचा चौकटीबाहेर जाऊन विचार करते, त्यामुळेच तिने रेखाटलेल्या चित्रांत जिवंतपणा जाणवतो. तिला आपल्या देशातील लोककला या माध्यमातून ग्लोबल करायचे आहे. सध्या ती याच प्रयत्नात आहे. तिची ही ‘स्मार्ट आर्ट’ आर्टवर्ल्डमध्ये फेमस करून आपल्या देशाचं नाव उंचवण्याचा तिचा वसा आहे. यासाठी आता ती विविध ठिकाणी फिरून खास रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शनही भरविणार आहे.