आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस खरेदीसाठी आतापासूनच नियोजन : उषा शिंदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील उषा शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कापूस उत्पादक महासंघाच्या अध्यक्षपदी महिला प्रतिनिधी विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या २५ वर्षांपासून येवला नगर परिषद ते वाशी बाजार समिती असा राजकारण व सहकारातील कामाचा अनुभव गाठीशी असलेल्या उषाताई आरक्षणाचा लाभ न घेता प्रत्येक वेळी खुल्या जागेतून निवडणूक लढून विजयी झाल्या आहेत हे विशेष. शेतीच्या अर्थकारणात बेदखल राहिलेल्या महिलेस या निमित्ताने संधी मिळाली आहे. या निवडीमुळे विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच महत्त्वाचे पद मिळाले. त्याचा अनुभव व भविष्यातील योजना याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.
 
प्रश्न - पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आपल्याला ही संधी मिळाली आहे, त्याचे कारण काय?  
> येवला बाजार समिती सभापती, वाशी बाजार समितीची संचालिका या नात्याने या कामाचा अनुभव आहे. ही निवड होत असताना हे विचारात घेतले गेले असावे. महिलेला संधी मिळाली तर ती पुरुषापेक्षा चांगले काम करू शकते हे मी आजवर सिद्ध करून दाखवले आहे. येवला बाजार समितीची सभापती म्हणून बाजारासाठी अत्यावश्यक ५ कोटींच्या सुविधा आम्ही राज्य व केंद्राच्या माध्यमातून आणल्या. अंदरसूल उपबाजार समितीत सुविधा उभ्या केल्या. पाटोद्याच्या दुसऱ्या उपबाजाराची प्रक्रिया सुरू केली. वाशी बाजार समितीवर संचालक म्हणून काम करताना देशव्यापी कामाचा अनुभव घेता आला.  
 
प्रश्न – पणन महासंघाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली आहे...  
> राज्यपातळीवर. कारण येवल्यात दोन वेळा मी बाजार समितीची सभापती म्हणून काम पाहिले आहे.   १९९१ पासून मी राजकारणात सक्रिय आहे, पण एकदाही आरक्षित जागेवर न लढता खुल्या जागांवरून लढून विजयी झाले. स्त्रियांच्या राजकीय व सार्वजनिक सहभागासाठी आरक्षण गरजेचे आहे, पण त्यापलीकडे महिलांनी त्यांची क्षमता सिद्ध करण्याची गरज आहे. वाशी बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी मला महिला म्हणून तिकीट नाकारण्यात आले होते, तेव्हा मी खुल्या जागेतून लढून विजयी झाले. आता पणन महासंघाची जबाबदारी देऊन पक्षाने मला राज्यातील शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली. हे काम करीत असताना महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही मी प्राधान्याने व जाणीवपूर्वक विचार करेन.  
 
प्रश्न– राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वरचा क्रमांक लागतो. त्यांच्यासाठी काय योजना असतील?  
>यंदा कापसाचा पेरा चांगला झाला आहे. त्यामुळे महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची घोषणा झाली तर त्या दृष्टीने आतापासूनच आम्ही व्यवस्था सज्ज ठेवणार आहोत. ३१ जुलैलाच त्याच्या नियोजनाची पहिली बैठक बोलावली आहे. कापूस खरेदी  प्रक्रियेत शेतकऱ्यांचे हित जपले जावे हाच कामाचा केंद्रबिंदू राहील. त्याच दृष्टिकोनातून मी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेन.
 
प्रश्न- उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने योजना काय?  
>पणन महासंघाचे अध्यक्षपद राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आहे. परंतु, गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच हे पद विदर्भाबाहेरील प्रतिनिधीस मिळाल्याने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विशेष अपेक्षा असतील, याची मला जाणीव आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारपर्यंत खान्देशातही कापसाचा पेरा वाढू लागला आहे. या सर्वांना चांगला भाव मिळावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
 
प्रदीर्घ अनुभव  
- २५ वर्षे येवल्यात नगरसेविका  
- ५ वर्षे येवल्याच्या नगराध्यक्षा  
- येवला बाजार समितीच्या दोन वेळा सभापती  
- ५ वर्षे वाशी बाजार समितीच्या संचालिका  
- पती माणिकराव शिंदे राष्ट्रवादीचे नेते  
- औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेडचे माहेर  
- १९९१ पासून राजकारणात सक्रिय  
बातम्या आणखी आहेत...