आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या मूर्तीतून फुलणार पर्यावरणस्नेहाचा ‘समर्थ’बीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या पर्यावरण प्रकृती विभाग व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने यंदा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत शाडू मातीच्या बीजगणेश मूर्ती वितरित करण्याचा संकल्प केला आहे. या मूर्तीमध्ये बेलाच्या बिया टाकण्यात आल्या असल्यामुळे ती उद्यानात वा रिकाम्या कुंडीत विसर्जित केल्यानंतर त्यातून अंकुर फुटणार अाहे. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची वाढत्या प्रमाणात होणारी प्रतिष्ठापना आणि त्यातून पर्यावरणाचे विशेषतः नदीचे प्रदूषण वाढत असल्याने आता विविध पातळ्यांवर शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. जागृतीच्या या मदतकार्यात आता धार्मिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. 

प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रातील स्वयंरोजगार आणि पर्यावरण विभागाच्या वतीने यंदा औरंगाबाद, पुणे, धुळे, नंदुरबार आणि लातूर जिल्ह्यात यंदा हा उपक्रम राबविला जात आहे. स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकमधील सेवेकरी प्रसिद्ध शिल्पकार शांताराम मोरे यांच्या सेवाभावी सहभागातून व सेवामार्गातील स्वयंरोजगार विभागांतर्गत श्री गणेशमूर्ती तयार करीत आहेत. यातून बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
  
मूर्तीचे स्वरूप
स्वामी समर्थ केंद्राचा वतीने तयार करण्यात येणारी मूर्ती ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गणेश मूर्तीसारखी आहे. तिचा आकार विसर्जनाचा उद्देश लक्षात घेता लहान असून त्यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केलेला आहे. पाचही जिल्ह्यातील स्वामी समर्थ केंद्रातील स्वयंरोजगार विभागांंतर्गत सध्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व मूर्तींमध्ये एकसारखेपणा असेल. मूर्तीत गावराण गायीचे गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप हे पंचगव्य टाकण्यात आले आहे. त्यातून सकारात्मक मानसिक ऊर्जा मिळते, अशी धारणा आहे.

नंतर राज्यभर उपक्रम
यंदा पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वितरणाचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या मूर्ती अतिशय अल्प किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापासून मात्र राज्यभरातील केंद्रांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी राज्यभरातील सेेवेकऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार अाहे. 
- आबासाहेब मोरे, अधिवक्ता, श्री स्वामी समर्थ सेवा व अाध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
बातम्या आणखी आहेत...