आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्लास्टिकमुक्त नाशिक’चा हरितकुंभसाठी संकल्प...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकचा कुंभ हरितकुंभ बनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून नाशिक प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी कुंभकाळात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडील प्लास्टिक पिशवी काढून त्याला कापडी अथवा कागदी पिशवी दिली जाणार आहे. त्यासाठी काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हजारो कापडी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असून, त्यात आपले योगदान म्हणून प्रत्येक कुटुंबाने त्याच्या घरातील रद्दी आणि किमान एक जुनी साडी दान म्हणून देण्याचे आवाहन हरितकुंभ समितीचे सदस्य राजेश पंडित यांनी केले.

जॉगर्स क्लब, वुमन्स क्लब आणि अन्य सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ‘ओझोन डे’निमित्त हरित कुंभ जनजागृती करण्यासाठी रविवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर हरितकुंभ रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रख्यात अभिनेते चिन्मय उद‌्गीरकर, अभिनेत्री मृणाल दुसानिस, आयोजक धनश्री हरदास, नितीन जुईकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना पंडित यांनी कुंभमेळा हा गोदावरीचा उत्सव असून, त्यानिमित्ताने आपण जणू गोदावरीलाच साडी अर्पण करीत आहोत, अशा भावनेतून हे दान केल्यास त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास रोखला जाणार असल्याचे सांगितले.

आयोजक धनश्री हरदास यांनी सर्व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या वापरणे टाळण्याचा तसेच एकूणच वापरातील प्लास्टिकचा वापर कमीतकमी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच, वीस हजार हरित सैनिकांच्या आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हजारो प्लास्टिक आणि कापडी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या वेळी कुंभमेळ्याचा मुळ उद्देश आणि त्याचा सद्यस्थितीशी सांगड घालण्याचे आवाहनदेखील उपस्थितांना करण्यात आले.

प्रत्येकाचेच योगदान महत्त्वाचे...
नाशिक शहर स्वच्छ राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अभिनेता चिन्मय उद‌्गीरकर याने हरितकुंभ जनजागृती रॅलीप्रसंगी बोलताना व्यक्त केले. त्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानीसने नाशिककरांनी जर हरितकुंभ यशस्वी करून दाखवला तर नाशकात कुंभमेळ्यादरम्यान येणारी प्रत्येक व्यक्ती एक वेगळा संदेश घेऊनच जाईल, असा आत्मविश्वास बोलून दाखवला.