आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेत प्लास्टिकच्या टिफीनला कायमची सुट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्लास्टिकमुळे आरोग्यावर आणि पर्यावरणावरही दुष्परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेत येथील इस्पॅलियर एक्स्पेरिमेंटल स्कूलने शाळेत प्लास्टिकच्या टिफीनवर बंदी आणली आहे. यापुढे प्लास्टिकचे टिफीन कोणीही वापरणार नाही, असा ठरावही पालकांनी केला. जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने शाळेने हा अभिनव पायंडा पाडला आहे.
प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढल्याने प्लास्टिकने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब विविध संशोधनांतून स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याचा नायनाट कसा करावा, असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर गेल्या अनेक वर्षांपासून उभा ठाकलेला आहे. याला पर्याय म्हणजे प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात कमी करणे. ही बाब लक्षात घेऊन कामटवाडे येथील इस्पॅलियर स्कूलने प्लास्टिकचे टिफिन वापरावर बंदी घालण्याचा निर्णय शाळेपुरता घेतला आहे. या निर्णयाचे पालकांनीही स्वागत केले आहे.
प्लास्टिकचा टिफीन आरोग्याला घातक
काही वेळा प्लास्टिकच्या डब्यात अन्नपदार्थ गरम असतानाच भरले जाऊ शकतात आणि ते दीर्घकाळ डब्यात ठेवल्यास अन्नपदार्थातील रसायने आणि प्लास्टिकचे काही घटक यांची रासायनिक प्रक्रिया होऊन आरोग्यास घातक असे रसायन तयार होते. एका संशोधनानुसार प्लास्टिकच्या डब्यातील गरम अन्नामुळे मुतखड्याची निर्मिती होऊ शकते, तसेच प्लास्टिकमुळे कर्करोगही होत असल्याचा निष्कर्ष काही संशोधकांचा आहे.
पाण्याच्या बाटलीवरही बंदीचा विचार
- वॉटरबॅग आणि प्लास्टिकच्या बाटल्यादेखील विद्यार्थी पर्यावरणाच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यावरदेखील बंदी आणण्याचा आमचा विचार आहे. परंतु, सध्या प्लास्टिकच्या बाटलीला पर्याय दिसत नाही. स्टीलच्या बाटल्यांची किंमत अधिक असल्यामुळे ती पालकांनाही परवडणार नाही.
सचिन जोशी, संचालक, इस्पॅलियर स्कूल
महिनाभर आधीच पालकांना सूचना
- हा निर्णय एकाएकी घेण्यात आलेला नसून एक महिना आधीच शाळेतील पालकांना तशी सूचना देण्यात आली हाेती, जेणेकरून नवीन नवीन शैक्षणिक वर्षात काेणी प्लास्टिकचे डबे आणणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह पर्यावरणाचेही संवर्धन होईल.
कांता पाथरे, मुख्याध्यापिका, प्रायमरी स्कूल
- आपल्या रोजच्या जीवनातील एक छोटा बदल एक दिवस मोठा बदल आणेल, असा आम्हाला विश्वास आहे. आज ८०० विद्यार्थी प्लास्टिकचे डबे वापरणार नाहीत, म्हणजे ८०० डब्यांची निर्मिती होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी टळू शकेल.
सबाखान, मुख्याध्यापिका, प्री-प्रायमरी स्कूल