आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यातून उमटतात भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-मनाच्या तळाशी असलेले जे गुपित आपण इतरांशीदेखील बोलत नाही, तेसुद्धा काव्यातून बाहेर येते. केवळ चेतनच नव्हे, अचेतन मनातील भावनाही काव्यातून उमटतात. कविता हा मानवतेचा सगळ्यात आतला आवाज असतो, असे प्रतिपादन प्रख्यात पंजाबी कवी डॉ. सुरजित पातर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ त्यांना शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात डॉ. पातर म्हणाले की, महाराष्ट्राचे थोर संत कवी र्शी नामदेव महाराज यांची पंजाबी भाषेतील कवने थेट गुरुग्रंथसाहीबमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, तेव्हापासूनच मराठी आणि पंजाबी भाषांचे अनुबंध जुळले असल्याचे त्यांनी नमूद केले. कुसुमाग्रजांच्या कवितांमधील विविध तालांनी मला प्रभावित केले असून, त्यांच्या काव्यातील वैविध्यदेखील मला भावल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, प्रमुख पाहुणे दिगंबर पाध्ये, केटीएचएमचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सूरजित पातर यांना मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या या विशेष पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असे आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी प्रास्ताविक करताना या पुरस्कारामागील संकल्पना विशद केली.
चंद्रकांत पाटील यांनी डॉ. पातर यांच्या निवडीसह कवितेच्या राष्ट्रीय परिप्रेक्ष्याची, तसेच नवकवितेच्या उदयासह पातर यांच्या काव्याची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्याम पाडेकर यांनी केले.