आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीतले बैल यंदाही येणार ‘पीओपी’च्याच रूपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पारंपरिक व्यवसायाला लागलेले महागाईचे ग्रहण आणि मातीचा तुटवडा यामुळे गणेश मूर्तींपाठोपाठ पोळा सणासाठीच्या बैलांची निर्मितीदेखील ‘पीओपी’पासून होऊ लागली आहे. यामुळे ‘पीओपी’चे संकट कमी होण्याऐवजी आजही कायम असल्याचे दिसते आहे.

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत आकर्षक बैलजोड्या अर्थात मूर्ती दाखल होऊ लागल्या आहेत. मात्र, यंदा मातीचा तुटवडा, मागणीच्या व पुरवठय़ातील तफावत दूर करण्याचा भाग म्हणून ‘पीओपी’पासून बनविलेल्या बैलांच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मातीच्या तुलनेत ‘पीओपी’च्या मूर्ती आकर्षक, टिकाऊ व कमी वेळत तयार होत असल्याने अनेक पारंपरिक कारागिरदेखील ‘पीओपी’कडे वळले आहेत. मातीच्या तुलनेत या बैलजोडीची किमत दुपटीने अधिक असली तरीही, आकर्षकतेमुळे या बैलांना मोठी मागणी आहे.

पोळ्यासाठी विविध रंग व आकारातील बैल विक्रीसाठी आले आहेत. मातीपासून बनविलेल्या बैलांना दरवर्षी मोठी मागणी असते. मात्र, आता पर्यायच नाही म्हणून ग्राहकांकडून उपलब्ध पीओपीच्या बैलांची विचारणा होऊ लागली आहे.

लहान, मध्यम व मोठे अशा तीन प्रकारांतील हे बैल लक्ष वेधून घेत आहेत. लहान आकारातील पाच बैल 30 ते 50 रुपये, मध्यम आकाराची बैलजोडी 70 ते 120, तर मोठया आकाराच्या बैलांची जोडी 250 ते 350 रुपयांना विक्री होते.

पोळा दोन दिवसांवर
बैल पोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने वर्षभरातून एकदाच येणार्‍या या सणाच्या पार्श्वभूमीवर कारागिरांनी संपूर्ण लक्ष बाजारपेठेवर केंद्रीत केले आहे. पोळयाच्या दिवशी बैलांची पूजा केली जात असली तरीही, त्यांची खरेही पूर्वसंध्येलाच होते. शहरातील रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड सह शहरातील उपनगरांमध्ये बैलांच्या खरेदीसाठी गर्दी होत असते.