आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७४१ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४६ जणांना पाेलिसांची ‘समज’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहाेचत असतानाच पोलिसांच्या धडक कारवाईने निवडणूक लढवणारे बाहुबली आणि त्यांच्या कुख्यात समर्थकांमध्ये धडकी भरली आहे. अशातच पोलिसांनी ७४१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. निवडणूक लढवणाऱ्या ४६ आजी-माजी नगरसेवकांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना चांगल्या प्रकारे ‘समज’ देण्यात आली आहे. या कारवाईसह दैनंदिन हजेरीही सुरू ठेवली आहे. तीन गुन्हेगारांना तडीपार केले आहे. पाच जणांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याद्वारे कारवाई करण्यात आली आहे. 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १३ पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. ‘अामच्याकडून गुन्हे घडणार नाही. शांतताभंग करणार नाही’, अशा अाशयाची हमीपत्रे याकरिता या संशयितांकडून भरून घेण्यात येत अाहेत. संबंधितांना याेग्य इशारा देण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 
निवडणूक लढवत असलेल्या ४६ जणांना पोलिस ठाण्यात बाेलावून ‘समज देण्यात आली असून, या इच्छुक उमेदवारांकडून हमीपत्रे घेण्यात आली आहेत. यात आजी-माजी नगरसेवकांसह सराईत गुन्हेगारांचाही समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातून तीन कुख्यात गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पाच गुन्हेगारांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 

पोलिस उपआयुक्त दत्ता कराळे (गुन्हे), लक्ष्मीकांत पाटील (परिमंडळ १), श्रीकांत धिवरे (परिमंडळ २), विभाग चे सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, विभाग चे डॉ. राजू भुजबळ, विभाग चे अतुल झेंडे, विभाग चे मोहन ठाकूर, गुन्हे शाखेचे सचिन गोरे यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सोमनाथ तांबे, दिनेश बर्डेकर, डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह सर्व १३ पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांकडून कारवाई सुरू आहे. 

गुन्हेगारांची तपासणी 
कोम्बिंग,ऑलआउट कारवाईसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी सुरू अाहे. या गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात दिवसातून दोन वेळा हजेरी लावण्यात आली आहे. परिमंडळ मधील १३ पोलिस ठाण्यांत नियमित कारवाई सुरू असल्याने बहुतांश गुन्हेगारांनी कारवाईचा धसका घेत शहरातून पलायन केले आहे. 

या पोलिस ठाण्यांत केली कारवाई 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ मधील नाशिकरोड, उपनगर, अंबड, इंदिरानगर, सातपूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांसह राजकीय नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक उपनगर आणि अंबड पोलिस ठाण्यात निवडणूक लढवणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना हजेरी लावण्यात आली आहे. समज देणाऱ्यांमध्ये गुन्हेगारांसह राजकीय नेत्यांचा समावेश आहे. 

कारवाई सुरूच राहणार आहे... 
^निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक कारवाई सुरूच राहणार आहे. शांतताभंग करण्यासह गुन्हे घडवण्याचा संशय असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई करण्यात आली आहे. या संशयितांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळातही ही कारवाई सुरूच राहणार आहे. -सचिन गोरे, सहायक आयुक्त (गुन्हे) 
बातम्या आणखी आहेत...