आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरकार’ पोलिसाचा नववीच्या विद्यार्थ्यास भररस्त्यात चोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘दादा, मला मारू नका हो,’ अशी विनवणी नववीतला तो मुलगा करीत होता; मात्र ‘दादां’ना काही दया येत नव्हती. एखाद्या गुंडाला पकडून ठोकावे, तशा पद्धतीने त्या मुलाचे बखोट धरून ‘दादा’ त्याला चोप देत होते. दादांचा रुद्रावतार पाहून बघ्यांची मुलाला सोडवण्याची हिंमत होत नव्हती. आपल्या या मदरुमकीमुळे रहदारी खोळंबल्याचे भानही ‘दादां’ना राहिले नव्हते. अखेर ते सारे असह्य होऊन बघ्यांपैकी एका ‘महिलेनेच’ पुढे होत दादांच्या तावडीतून त्या मुलाला सोडवले..मुलाचा गुन्हा होता पोलिसाच्या दुचाकीला अनवधानाने लागलेला धक्का!

सोमवारी (दि. 1) दुपारी 2 वाजेच्या सुमारास नवीन पंडित कॉलनीतील रस्त्यावर घडलेला हा संतापजनक प्रकार. सिंधू सागर अकॅडमीत शिकणारा संदीप यादव हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी जाण्यास निघाला. अनवधानाने रस्त्याने जाणार्‍या दुचाकीला (एम.एच. 15, सी.एन. 7033) त्याने धडक दिली. मात्र, त्या बिचार्‍याला कल्पना नव्हती की त्याचा धक्का लागलेली दुचाकी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या एसआयसाहेबांची (सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक कोटकर) आहे. ‘दादां’च्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता संदीपला भररस्त्यात चोप देण्यास सुरुवात केली. भेदरलेला संदीप रडत-रडत ‘दादां’ची माफी मागू लागला. मात्र, एखादा ‘वाँटेड’ सापडल्याच्या थाटात ‘दादा’ त्याला सोडायला तयार नव्हते. एरवी, अशा घटनेत बघे मध्यस्थी करू पाहतात; पण ‘दादां’ना रोखण्याची हिंमत कोण करणार? कोणीच पुढे होत नाही हे पाहून गोविंदनगर परिसरातील एका महिलेने संदीपला सोडवण्याचा प्रयत्न केला, तरीही दादा संदीपला सोडत नव्हते. या प्रतिनिधीने छायाचित्र घेण्यास सुरुवात करताच दादांचा पारा धाडकन कोसळला व संदीपला ‘चुपचाप’ घरी जाण्याचा हुकूम सोडून काही घडलंच नसल्याचा आव आणत दादा मार्गस्थही झाले.