आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांना मारहाण केल्यास प्रत्युत्तर, कृती समितीचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विद्यार्थी वाहतूक करताना अनुचित प्रकार रिक्षाचालकांकडून घडला नसतानाही आरटीओ व पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली अत्याचार सुरू आहेत. नाशिकरोडला एका रिक्षाचालकास पोलिसांनी नुकतीच मारहाण केली. हे अशोभनीय कृत्य असल्याचा निषेध करत आता मारहाण करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यास त्याच स्टाईलने प्रत्युत्तर दिले जाईल, अशा इशारा विद्यार्थी वाहतूक कृती समितीने दिला.

जिल्हाधिकारी विलास पाटील यांनीही सायंकाळी आरटीओ अधिकार्‍यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या चालकांना पोलिस व आरटीओकडून नियमित लक्ष्य केले जात असल्याच्या विरोधात सोमवारी सर्वपक्षीय विद्यार्थी वाहतूक कृती समितीने भालेकर मैदानापासून काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आरटीओ व पोलिसांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. गणेश परदेशी या रिक्षाचालकाच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्‍यांविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला. आंदोलनात शशी उन्हवणे, बाळासाहेब पाठक, अजय बागुल, शिवाजी भोर आदी सहभागी होते.

मोर्चेकरी रिक्षाचालकाचा मृत्यू

मोर्चात सहभागी झालेले साईनगरातील (अमृतधाम) बाबुराव हसाळे (41) या रिक्षाचालकाचा सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मोर्चानंतर घरी गेलेल्या हसाळे यांना त्रास जाणवू लागला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरटीओकडून सुरू असलेल्या कारवाईच्या धसक्याने हसाळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी केला.

दलालांशी संबंधित कर्मचार्‍यांवर नजर

आरटीओतील दलालाच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी दलालांशी संबंधित कर्मचार्‍यांवर नजर ठेवून कारवाई होईल असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेतील संशयित एजंटशी संबंधितांच्या चौकशीची शक्यता आहे.