आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Commissioner Building Opening Issue In Nashik

‘ग्रीन बिल्डिंग’ला प्रतीक्षा उद्घाटनाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या अडीच दशकापासून भाड्याच्या जागेवर असलेले पोलिस आयुक्तालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होणार असून, यासाठी गंगापूररोडवर तीन मजली अद्ययावत वास्तू उभारण्यात आली आहे.
बांधकाम, अंतर्गत सजावट पूर्ण झालेली ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुढील आठवड्यात गृहमंत्री आर. आर. पाटील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार असून, त्याच वेळी उद्घाटनाची शक्यता वर्तवली जात आहे.

तळमजल्यावर हॉटेल, व्यावसायिकांना आवश्यक परवानग्या घेण्यासाठी आयुक्तालयात ‘एक खिडकी योजनेचा कक्ष’देखील असेल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आयुक्तालयाची पहिलीच आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत व पर्यावरणपूरक इमारत असेल. विशेष म्हणजे ग्रीन बिल्डिंग संकल्पनेंतर्गत मोठी वीज बचत होणार आहे. आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी नियंत्रण, कर्मचारी कल्याण, आयुक्तालय इमारत विषयावर पाठपुरावा यांमुळे मंजूर इमारतीचे काम पूर्ण झाले. त्यास सुमारे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे.

अशी आहे इमारत : तळमजला आणि त्यावर दोन पूर्ण व तिसरा अर्धा मजला असे सुमारे 50 हजार चौरस फूट बांधकाम राहील. तळमजल्यावरच हॉटेल व इतर परवानग्यांसाठी येणा-या ग्राहकांसाठी ‘एक खिडकी योजना’ कक्ष, चारित्र्य पडताळणी, पारपत्र चौकशी, विशेष शाखा विभाग, उपाहारगृह, नियंत्रण कक्ष, प्रवेशद्वारावर अपंग, वृद्धांसाठी रॅम्प आणि आत दोन मजल्यांवर जिना, लिफ्ट असेल. पहिल्या मजल्यावर आयुक्तांचे दालन, त्यांचे स्वीय सहायक व इतर दोन उपआयुक्तांचे कक्ष, दुस-या मजल्यावर प्रशासकीय कार्यालय, मंत्रालयीन कर्मचारी, कल्याण निधी कक्ष, गुन्हा शोध पथक कक्ष आणि तिस-या मजल्यावर रेकॉर्ड रूम राहील. इमारत आवारात बिनतारी संदेश, सॅटेलाइट यंत्रणा असेल.

नाशिककरांना कायमची सुविधा
या इमारतींमुळे अधिकारी-कर्मचा-यांबरोबर नाशिककरांसाठी कायमची सुविधा उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर पर्यावरणपूरक अशा इमारतीत नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष, ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह आहे. बांधकाम पूर्ण झाले असून, आठवडाभरात इमारत ताब्यात मिळणार आहे. कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त