आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड पाेलिस ठाण्याच्या अावारात हवालदाराची मध्यरात्री अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी हवालदार भाऊसाहेब सोनवणे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच गळफास घेऊन साेमवारी मध्यरात्री आत्महत्या केली. पहाटे हा प्रकार लक्षात आला. मनमिळाऊ स्वभावाच्या साेनवणे यांच्या अात्महत्येबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या अात्महत्येचे कारण समजू शकले नाही. पाेलिस याबाबत अधिक तपास करीत अाहेत.
गोपनीय विभागात काम करणारे हवालदार भाऊसाहेब यशवंत सोनवणे (४७, रा. उत्तमनगर, सिडको) यांनी पोलिस ठाण्याच्या अावारातच मध्यरात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. साेनवणे यांनी रविवारी दिवसभर कार्यालयीन काम केले. यानंतर रात्री ते घरी गेलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी पहाटे त्यांना माेबाइलवर फोन केला असता पोलिस ठाण्याच्या मागील बाजूकडून फोनची रिंग ऐकू अाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास बच्छाव त्या ठिकाणी गेले असता त्यांच्या लक्षात हा दुर्दैवी प्रकार आला. त्यांनी याबाबत तत्काळ वरिष्ठांना कळविले.

उपायुक्त विजय पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सिडको परिसरात अंबड पोलिस ठाण्यावर शाेककळा पसरली. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या सोनवणे यांच्या निधनाबाबत सर्वांंनी हळहळ व्यक्त केली.

साेमवारी सायंकाळी त्यांच्यावर आघार या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, नगरसेविका रत्नमाला राणे, नगरसेविका शीतल भामरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

मृत्यूपूर्वी चिट्ठीतून व्यक्त केल्या भावना
नेहमीमाणसे जोडणारे सोनवणे अतिशय मनमोकळे होते. पोलिस असूनही त्यांचे वागणे हे विनयशील असे हाेेते. यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायची. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्वांची माफी मागून अापण जीवनयात्रा संपवित असल्याचे अापली काेणाहीबाबत तक्रार नसल्याचे म्हटले अाहे. जीवनात ज्या-ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले अाहेत.

उत्कृष्ट क्रीडापटू
भाऊसाहेब सोनवणे हे उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, धावणे या खेळांत आवड होती. कुस्ती धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळाली होती. १९९१ मध्ये ते पाेलिस दलात भरती झाले हाेते.

अतिशय दुर्दैवी घटना
भाऊसाहेब सोनवणे अतिशय चांगले कर्मचारी होते. त्यांनी कधीही कुणाबद्दल तक्रार केली नव्हती. मात्र, ते या थराला का गेले, याबाबत आम्ही योग्य तो तपास करू. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पोलिस खाते उभे आहे. मधुकरकड, वरिष्ठ निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...