आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुरात ‘खाकी’ने वाचवले १५ नागरिकांचे प्राण, अडकलेल्यांना सुखरूपरीत्या काढले बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गोदावरीच्या महापुराने हाहाकार उडाला असतानाच एका इमारतीमध्ये अडकून पडलेले १५ नागरिक मदतीची याचना करत होते. शहरातील वाहतूक ठप्प झाल्याने मदत पथकही तेथे पोहाेचणे अशक्य असताना पोलिस अधिकाऱ्यांसह महिला अधिकाऱ्यांनी अापल्या जीवाची पर्वा करता पाण्यात मानवी साखळी तयार करत मानवी मनाेरा रचत इमारतीमध्ये अडकलेल्या गराेदर महिलेसह पंधरा नागरिकांचे जीव वाचवले. पंचवटी आणि सरकारवाडा पोलिसांनी दाखवलेल्या या शौर्याने पोलिस खात्याची प्रतिमा उंचावली अाहे.

नेहरू चौकातील मेदगेवाड्यात पाणी शिरल्याने हे नागरिक ओरडून मदत मागत होते. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी अापत्कालीन विभागाशी संपर्क साधला. सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव, पुष्पा निमसे, उपनिरीक्षक संदीप कांबळे, योगेश उबाळे, अादीनाथ मोरे, अतिश शिंदे, सुनील जगदाळे, दीपक बारहाते हे दोरखंडाच्या साह्याने मानवी साखळी तयार करत वाड्यापर्यंत पोहाेचले. पुरुष अधिकाऱ्यांनी मानवी मनाेरा रचत वाड्यातील एक-एक करत दहा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

याचप्रकारे कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागील इमारतीला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले कर्मचाऱ्यांनी पाण्यात पोहत जाऊन एका गराेदर महिलेसह तीन मुले, दोन वृद्ध तीन महिलांना खांद्यावर घेत वाचवले. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य करण्यात आले.

साधूंसह चार श्वानांचे वाचवले जीव
सकाळी११ वाजता महापुराचे पाणी वाढल्याने आसारामबापू पूल आणि रामवाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रामवाडी पुलाच्या शेजारील मंदिरात दोन साधू आणि चार श्वान अडकल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पाण्याच्या प्रवाहात जीव धोक्यात घालून सरकारवाडा पोलिसांनी साधूंसह चार श्वानांना खांद्यावर घेत सुरक्षितस्थळी हलवले. साधूंनी गंगेच्या दर्शनाचा अट्टाहास करण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठ निरीक्षक डॉ. कोल्हे यांनी साधूंची समजूत काढत त्यांना बाहेर येण्याची विनंती करत खाकीतील माणुसकीचे दर्शन घडवले.
बातम्या आणखी आहेत...