आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेलेले परत मिळाले हेच आश्चर्य; नागरिकांनी व्यक्त केल्या पोलिसांविषयीच्या भावना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चोरीस गेलेला माल, दागिने परत मिळू शकतात, हाच मोठा आश्चर्याचा धक्का आहे, वर्षभरात पोलिस दलाचे खरे रूप बघावयास मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अमेरिकन स्कूल ऑफ लॉ आणि बंगळुरूच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचे प्रतिनिधी शहरभेटीवर आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना नाशिककर पोलिसांबद्दलचा अनुभव सांगत होते.

गुन्हेगारीविरोधात पोलिसांच्या उपक्रमांच्या अभ्यासासाठी संस्थेचे सहायक संचालक संतोष र्शीनिवास आणि सुचित अंबाडापुडी नाशिकच्या भेटीवर आहेत. विविध स्तरांतील जवळपास 200 नागरिकांकडून सुरक्षिततेविषयी त्यांनी मते जाणून घेतली. मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात या प्रतिनिधींसमवेत शेल कंपनीचे संचालक संजय लोढा उपस्थित होते.

मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला या प्रसंगी म्हणाली की, गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याची तक्रार केली. तेव्हा शेजारी, नातलगांनी ‘चोरीस गेलेले सोने परत मिळते का?’ अशी कुचेष्टा केली. मात्र, तीन महिन्यांनी चोरीची पोत सापडल्याची माहिती पोलिसांनी घरी येऊन सांगितली. तेव्हा धक्काच बसला. एक कोटीची रक्कम चोरीस गेलेल्या सिडकोतील व्यावसायिकानेही आपला अनुभव सांगितला. भेटायला येणारा प्रत्येक जण ‘आता मिळणार नाही, पोलिसांवर काय विश्वास ठेवता?’ असे म्हणत होता. मात्र स्वत: आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी आठवडाभर पोलिस ठाण्यात तासन्तास बसून तपास केला. दहा दिवसांत गुन्हा उघड केल्याचे मुकुंद मांडगे यांनी सांगितले.

यांच्याशी संवाद
या प्रतिनिधींनी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा, अभय तातेड, आमदार जयवंत जाधव, नगरसेवक गुरुमित बग्गा, डॉ. विशाल घोलप, नगरसेविका कविता कर्डक, सीमा हिरे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, संतोष मंडलेचा, आर्किटेक्ट अमृता पवार, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. कुलकर्णी, प्राचार्य किशोर पवार यांच्यासह विविध सामाजिक संघटना, महिला, विद्यार्थ्यांची भेट घेतली.