आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीतून गोळी सुटून नागपुरात पोलिसाचा मृत्यू, अधिकारी जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - कामगिरीवरून परतल्यावर पोलिस मुख्यालयात बंदूक जमा करताना बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे एका जवानाचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलिस अधिकारी जखमी आहे. या प्रकाराने लोहमार्ग पोलिसांत एकच खळबळ उडाली.

राजेश भागडीकर असे मृतक जवानाचे नाव आहे. राजेश भारतातील कुख्यात गांजा तस्कर टुन्ना याला पकडण्यासाठी आसाम राज्यातील पुरी येथे गेले होते. मंगळवारी मध्यरात्री ते पुरीवरून परतले. बुधवारी सकाळी त्यांनी पोलिस मुख्यालयात हजेरी लावली. पुरीला जात असताना कार्यालयाने दिलेली बंदूक जमा करण्यासाठी ते शस्त्रगाराचे अधिकारी एकनाथ लाऊतकर यांच्याकडे गेले. लाऊतकर यांनी भागडीकर यांच्याकडून बंदूक स्वीकारली आणि मॅगझिन वेगळी केली. यानंतर बंदूक रिकामी झाल्याचे समजून डाव्या हाताच्या पंजावर चालवली. मॅगझिन काढल्यानंतरही बंदुकीत एक गोळी शिल्लक होती.

बंदुकीचा घोडा दाबल्यानंतर गोळी सुटली आणि लाऊतकर यांच्या हाताचा पंजाच्या आरपार समोर उभा असलेल्या भागडीकर यांच्या पोटात शिरली. गोळी लागूनही त्यांना काहीच समजले नाही. त्यामुळे बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या आवाजाने घाबरून ते शस्त्रागाराबाहेर पळाले. शस्त्रागाराच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्यांच्या अंगातून रक्त वाहू लागले आणि ते खाली कोसळले. परिसरातील इतर जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भागडीकर यांचा मृत्यू झाला, तर लाऊतकर यांच्यावर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात लोहमार्ग पोलिस उपअधीक्षक गोपाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनवधानाने ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला, तर मृतकाचा भाऊ अप्पा भागडीकर यांनी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी लाऊतकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.