नाशिक- त्र्यंबक नाक्यावर सुरू असलेल्या बॉलगेम नामक जुगाराच्या अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. त्यात जुगार खेळणारे १४ जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडून एक लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिवसभर व्यापारानिमित्त शहरात कामे करायची आणि सायंकाळी रात्री या ठिकाणी जुगार (बॉलगेम) खेळायचा, असा त्यांचा दिनक्रम होता. चार दिवसांपूर्वीच त्र्यंबकनाक्यावरील एका हॉटेलजवळ हा अड्डा सुरू करण्यात आला हाेता. उपआयुक्त बारगळ यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईसाठी सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांचे विशेष पथक तयार केले. या कारवाईत १४ जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, एक लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई सुरू राहणार...
- तीन ते चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या बॉलगेमच्या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून १४ जणांसह लाख १४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशीच कारवाई शहरभरात सुरू राहणार आहे.
-अविनाश बारगळ, पोलिस उपआयुक्त