आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचारी सोनवणे दांपत्यास पाेलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण याचा अतिशय निकटवर्तीय विश्वासू समजला जाणारा पोलिस कर्मचारी रमेश सोनवणे त्यांची पत्नी अाणि कंपनीची ७५६ क्रमांकाची एजंट शोभा साेनवणे या दोघांना अार्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करताच या प्रकरणाच्या तपासाला नवीन वळण मिळाले अाहे. या दाेघांना मंगळवारी न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली अाहे. संशयित साेनवणे दांपत्य यांनी अापले शेकडाे नातलग, पाेलिस दलातीलच अधिकारी कर्मचाऱ्यांची रक्कम केबीसीत गुंतवली असल्याची बाब समाेर अाली अाहे. दरम्यान, सामान्य पाेलिस कर्मचारी असलेल्या साेनवणे यांनी काही वर्षांतच काेट्यवधींची मालमत्ता जमा केल्याची शक्यता असून त्या दिशेने तपास केला जात असल्याचे पथकाने सांगितले.

देशभरात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यात कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण त्याची पत्नी अारती चव्हाण यांना सिंगापूरहून मुंबईत अाणून अटक करण्यात अालेल्या सर्वात माेठ्या कारवाईनंतरची ही दुसरी मोठी कारवाई ठरली अाहे. २०१४ मध्ये आडगाव पोलिस ठाण्यात भाऊसाहेब चव्हाणसह त्याची पत्नी आरती, त्याचा भाऊ बापू चव्हाण, त्याची पत्नी, मेव्हणा पोलिस कर्मचारी संजय जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. त्यापाठाेपाठ चव्हाण दांपत्य वगळता इतरांना अटक करण्यात अाली अाहे. मात्र, या घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण याचा उजवा हात समजला जाणारा पोलिस कर्मचारी रमेश सोनवणे हा सहीसलामत सुटला हाेता.

साेनवणे याच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेकडून सोनवणेच्या सर्व बँक व्यवहाराची गोपनीय तपासणी सुरू होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी एका बँकेत सोनवणेच्या खात्यातून साडेचार लाख रुपयांची रक्कम पत्नी शोभा यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे तपासणीत उघडकीस आले. याबाबत सोमवारी सोनवणे त्याच्या पत्नीची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर दोघांच्या जबाबात तफावत अाढळली. सदर प्रकार पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांनी तत्काळ संशयितांना अटक करण्याच्या सूचना देत कारवाई करण्यात अाली.

संशयित साेनवणे दांपत्यास न्यायालयात हजर केले असता सरकार पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कंपनीच्या अल्पावधीत झालेल्या प्रचंड विस्तारात, एजंट नियुक्ती, जागा, कार्यालय, मालमत्ता खरेदीच्या प्रत्येक कामात या दांपत्याचा सहभाग असल्याचे उघडकीस अाले अाहे. केबीसी या कंपनीच्या मोठ्या समारंभामध्ये सोनवणे हा भाऊसाहेब चव्हाण याच्यासोबत व्यासपीठावर अनेक वेळा दिसून आला असून त्याने मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा संशय अाहे. त्याचे अनेक बँकांमध्ये खाते अाणि लाॅकर्स असून, त्याची तपासणी करणे अावश्यक असल्याने १० दिवसांच्या पाेलिस काेठडीची मागणी अॅड. चंद्रकाेर यांनी केली. त्यावर न्यायालयाने सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

दणाणले पाठीशी घालणाऱ्यांचे धाबे
केबीसीच्याकार्यक्रमात सूटबूट घालून गुंतवणूकदारांना याेजना समजावून सांगणाऱ्या साेनवणेवर कारवाई हाेत नसल्याने अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ हाेते. याबाबत पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई हाेत नसल्याने साेनवणेही बिनधास्तपणे पाेलिस खात्यात रुजू हाेऊन काम करीत हाेता. चव्हाण दांपत्य सिंगापूर येथे पळून गेल्यानंतर कंपनी त्यांचे आर्थिक व्यवहार सोनवणेच बघत असल्याचा संशयही पाेलिसांकडून व्यक्त केला जात हाेता. अखेरीस त्याच्यावर कारवाई झाल्याने त्यास पाठीशी घालणाऱ्या अनेक पाेलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले अाहे. साेनवणे ज्या सातपूर पाेलिस ठाण्यात कार्यरत अाहेत, त्या ठाण्याचे प्रमुख त्यास अटक झाल्यांनतरही अापल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगत असल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...