नाशिक - भरधाव वेगात जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या स्विफ्ट कारने तीन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात डॉक्टरसह एक महाविद्यालयीन तरुण गंभीर जखमी झाला, तर दोघे किरकोळ जखमी झाले. मंगळवारी दुपारी दोन वाजता टिळकवाडी सिग्नलवर हा अपघात घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरणपूररोडमार्गे ‘रामायण’ बंगल्याकडून केटीएचएमकडे जात असताना टिळकवाडी सिग्नल बंद असल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (एमएच ०६, सीजी ८२०३) तीन दुचाकींना (एमएच १५, डीए ३५४) आणि (एमएच १५, डीएफ ८९०३) अाणखी एक दुचाकी यांना धडक दिली. यामध्ये डॉ. विनोद गुजराथी आणि कौशल घोडके (१६) हे दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्यास बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीमध्ये अर्जुन विठ्ठल अाघाव (बक्कल नंबर ४००), नेमणूक पोलिस मुख्यालय असे नाव निष्पन्न झाले. या पाेलिस कर्मचाऱ्याने मद्य प्राशन केलेले असल्याने कारवर त्याला नियंत्रण राखता आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. अपघातग्रस्त कार आणि पाेलिस कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पुढे जाऊन त्यास सोडून देण्यात येईल, असा संशय आल्याने नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी नागरिकांची समजूत काढत पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे अाश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. अखेर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात अाला असून, त्याने मद्य प्राशन केले की नाही, हे निष्पन्न हाेणार असल्याचे सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी सांगितले.