आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेम्बिंगमध्ये ८० गुन्हेगार, १७० टवाळखोरांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच असून, सोमवारी मध्यरात्री परिमंडळ मध्ये करण्यात अालेल्या धडाकेबाज कोम्बिंग आणि ऑलआउट कारवाईमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ८० गुंडांना ‘अल्टिमेटम’ देण्यात आला. १७० टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या बाहुबली शहराध्यक्षाला त्याच्याच मोहल्ल्यात अल्टिमेटम देत पोलिसांनी ‘भाईगिरी’ची हवाच काढून टाकली. या कारवाईमुळे गुंडांच्या समर्थकांसह गुंडांना अर्थसाह्य करणाऱ्यांमध्ये खाकीची जरब बसली अाहे.
शहरातील खूनसत्रामुळे पालकमंत्री गिरीश महाजन अाणि राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस आयुक्तांना परिस्थिती सुधारण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम पोलिस आयुक्तांनी आव्हान म्हणून स्वीकारत सर्व सूत्रे हाती घेत पोलिस दलामध्ये गुन्हेगारीविरोधात कारवाईचे रणशिंग फुंकले. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये या आदेशाने ऊर्जा निर्माण झाल्याने काही दिवसांपासून ढेपाळलेली खाकी पुन्हा ‘सतर्क’ झाली अाहे. एकापाठोपाठ घडत असलेल्या खुनाच्या घटना उघडकीस आणण्यात अाल्या. यामध्ये एक-दोन खुनांच्या घटना वगळता बहुतांशी खून हे किरकोळ कारण आणि पूर्ववैमनस्यातून झाले असल्याचे उघडकीस आणले. मात्र, या घटना रोखण्यासाठी आयुक्तांनी कायद्याच्या पलीकडे पोलिसिंग राबवत टिप्पर गँगच्या चार कुख्यात गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृहातून राज्यातील इतर कारागृहात रवाना करण्यात अाले. पोलिस आयुक्तांच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी कारवाई ठरली. कारवाईचा धडाका सुरू ठेवत सोमवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये एका राजकीय पक्षाचा बाहुबाली शहराध्यक्ष राहात असलेल्या परिसरात जाऊन पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या गँगची हवाच काढून टाकली. पुन्हा बॉडीगार्ड घेऊन फिरताना दिसल्यास परिणाम वाईट होतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
मल्हारखाण, मोरे मळा, रामवाडी, फुलेनगर, हनुमानवाडी, म्हसरूळ, आडगाव भागात राहणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झडती घेतली. ८० गुन्हेगारांवर कारवाई, तर १७० टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यामुळे बहुतांश गुंडांनी पोलिसांना लेखी ‘बाॅण्ड’ करून देण्याची तयारी दाखवत गुन्हेगारी सोडून देण्याचा इरादा स्पष्ट केला.

अशी झाली कारवाई
काेम्बिंग कारवाईमध्ये साेमवारी मध्यरात्री पाेलिस उपअायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सराईत गुंडांना अशाप्रकारे चांगली समज दिली.

या अधिकाऱ्यांचा कारवाईत सहभाग
परिमंडळ मध्ये उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे, बाजीराव महाजन, दिनेश बर्डेकर, नरेंद्र पिंगळे, मधुकर कड, मनोज करंडे, सदानंद इनामदार, संजय देशमुख, राजेंद्र कुटे, संजय सानप, अशोक भगत यांच्यासह १५० पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

शहराच्या सुरक्षेसाठी पाेलिसांची कारवाई
शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना शहर सुरक्षित वाटावे यासाठी यापुढेही कारवाई सुरूच राहणार अाहे. नागरिकांनी पाेलिस प्रशासनास सहकार्य करावे. अनुचित प्रकार पोलिसांना कळवावे. -एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

गुन्हेगार तपासणी : आडगाव- ४, म्हसरूळ - ५, पंचवटी - ९, भद्रकाली - ४, मुंबई नाका - ७, सरकारवाडा - ६, गंगापूर - ६, अंबड - ९, इंदिरानगर - ७, उपनगर - ८, नाशिकरोड - ११, देवळाली कॅम्प - ४, एकूण - ८०. तडीपार केलेल्या चार गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्यात आली. १७ हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी परिसरात टोळक्याने बसणाऱ्या १७० टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ४४० वाहनांवर कारवाई करण्यात आली. रात्री वाहन चालवणाऱ्या १९९ टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्यांकडे करा व्हॉट्स अॅपवर तक्रार
शहरातवाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी थेट परिमंडळ चे पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील (७७४१०९९७७७) आणि परिमंडळ चे उपआयुक्त श्रीकांत धिवरे (९०७५०११२२२) यांच्या माेबाइल क्रमांकावर परिसरातील तक्रारी, टवाळखोरांची माहिती गुन्ह्यांचे फोटाे व्हॉट्सअॅप करावे किंवा संदेशाद्वारे तक्रार करावी, असे अावाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. तक्रारदाराच्या नावाची गुप्तता पाळण्यात येईल. वैयक्तिक स्वरूपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही याची नागरिकांनी दखल घ्यावी, असे पाेलिस यंत्रणेमार्फत कळविण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...