आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राष्ट्रवादी'त रंगला काटाकाटीचा खेळ, शहराध्यक्षपदासाठी जाेरदार लाॅबिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनांतर्गत निवडणुकांमुळे वातावरण चांगलेच तापले असून, शनिवारी (दि. ४) माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासमाेर इच्छुकांनी विद्यमान पदाधिका-यांचा पत्ता कट करणे कसे गरजेचे आहे त्यांच्यामुळे पक्षात कशी मरगळ आली याविषयी सुरस किस्से सांगितल्याचे वृत्त आहे. यावेळी इच्छुकांनी जाेरदार शक्तिप्रदर्शनही केले. दरम्यान, शहराध्यक्षपदाची खांदेपालट करण्यासाठी एक गट पुढे आला असून, या पार्श्वभूमीवर १३ एप्रिलला हाेणारी निवडणूक रंगात आली आहे.

लाेकसभा विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुनरागमनासाठी कंबर कसली आहे. संघटनात्मक निवडणुकांमधून नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अगदी तळापासून तर पक्षाच्या प्रदेश स्तरावरील निवडणुकीसाठी सध्या चाचपणी केली जात आहे. या निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेता, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. दाेन दिवसांपूर्वी खुद्द भुजबळ यांनी सर्व ज्येष्ठ पदाधिका-यांशी वैयक्तिक चर्चा करून शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काेणाकडे द्यायची, याविषयी मत-मतांतरे जाणून घेतली. शनिवारी मात्र समीर भुजबळ यांनी विभागीय अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांची मनाेगते एेकली. त्यासाठी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतल्या. त्यात प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीत काेणी, कसे पक्षविराेधी काम केले पक्षाला बदनाम करण्यासाठी काेण कशा याेजना आखते, याचीच माहिती भुजबळ यांच्यासमाेर मांडल्याचे समजते. यानिमित्ताने पक्षविराेधी काम करणा-यांची आयतीच माहितीही वरिष्ठांकडे गेली.

दुसरीकडे, शहराध्यक्षपदावरून अर्जुन टिळे यांना हटवून नवीन पदाधिका-याला संधी देण्याचीही मागणी केल्याचे वृत्त आहे. मध्यंतरी टिळे हेही आपल्याविराेधात असलेल्या एका गटामुळे चांगलेच त्रस्त झाले हाेते. त्यातून स्वत:च शहराध्यक्षपद साेडण्याची मानसिकताही केल्याची चर्चा हाेती. दरम्यान, सद्यस्थितीत टिळे पुन्हा सक्रिय झाले असले तरी, पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

पदाधिका-यांना ‘नाे एंट्री’
भुजबळयांच्या उपस्थितीत चाचपणी सुरू असताना आमदार जयवंत जाधव, शहराध्यक्ष अर्जुन टिळे अन्य इच्छुकांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. फक्त कार्यकर्त्यांचेच म्हणणे एेकून घेतले गेले. इच्छुकांचा दबाव वा प्रभाव पडणार नाही, ही त्यामागची काळजी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने गटाने आणलेल्या कार्यकर्त्यांद्वारे लाॅबिंग करण्याचा प्रयत्नही लपून राहिला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.