आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या खेळीने मनसेची पुन्हा गोची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेची सत्ता मिळवणार्‍या मनसेची आर्थिक कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडीने शिवसेनेच्या मदतीने स्थायी काबीज केल्यानंतर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा ‘अर्थ’ प्राप्त झालेल्या डीपीसी (जिल्हा नियोजन समिती) निवडणुकीतही ही युती पुन्हा एकदा आकारास आल्याने मनसेची गोची करण्याचा प्रयत्न काहीअंशी तरी यशस्वी झाला आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, प्रत्यक्षात त्यांना केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेने सर्वाधिक 40 जागा मिळविल्या. जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळांनी जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला. मात्र, महापालिकेतील अपयश जिव्हारी लागल्याने मनसेची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार, स्थायी समितीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा अध्यक्ष बसवत आर्थिक नाड्या आपल्याकडे ठेवल्या.

तसेच, शहर आणि जिल्ह्याच्या विकासात मनसेला कुठलेही र्शेय मिळू न देण्याच्या धोरणानुसार डीपीसी निवडणुकीत सर्वच विरोधकांना एकत्र करत जिल्हा नियोजन समितीतूनही मनसेला दूर ठेवण्याचाच प्रयत्न झाला. सिंहस्थात अधिक निधीची मागणी करण्यासाठी गेलेल्या महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींनाही त्यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला देत गोदावरीची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. मात्र, जादा निधीबाबत कुठलेच आश्वासन दिले नाही.

एकीकडे तिसरा महाजची खेळी, तर दुसरीकडे केवळ मनसेचीच कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला नसून, आघाडीतीलही आपल्या सर्वच विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याचे चित्रही या निवडणुकीच्या माध्यमातून पाहावयास मिळाले. तिसर्‍या महाजने आघाडीला गाजर दाखवत मनसेच्या बाजूने मतदान केले. कारण, महाजच्या एजाज अहमद मोहंमद उमर यांना 104 मते मिळाली. त्या तुलनेत कॉँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांना केवळ 32 मते मिळाली. मनसे-भाजपचा 56 मतांचा कोटा होत असतानाही नगरसेवक सलीम शेख यांना 83 मते मिळाली, हा अभ्यासाचा विषय ठरला असून, शेख यांचे व्याहीच मालेगावचे रशीद कुटुंबातील असल्याने तिसर्‍या महाजने मनसेच्या बाजूने कौल दिल्याचे बोलले जात आहे.