आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीची दादागिरी; काँग्रेसची गांधीगिरी, आदिवासी सांस्कृतिक परिषदेवर बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त शुक्रवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक परिषदेला हायजॅक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाल्यानंतर कॉँग्रेसच्या मंत्र्यापासून तर स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनीच गांधीगिरी करीत या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रमाच्या मूळ आयोजकांनाच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व राष्ट्रवादीच्या तथाकथित पदाधिकार्‍यांनी कशा पद्धतीने कात्रजचा घाट दाखवत दूर केले, याचे पुरावे सादर करीत आदिवासी संघटनांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने कॉँग्रेस आघाडी अंतर्गत रंगलेल्या राजकारणाचा नवा अंक समोर आला.

नाशिक विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने तसेच शासनाच्या वतीने हा कार्यक्रम असल्याने काँग्रेसच्याही पदाधिकार्‍यांची नावे निमंत्रण पत्रिकेत असणे आवश्यक होते. मात्र, राष्ट्रवादीने आदिवासी मतांवर डोळा ठेवून काँग्रेस नेत्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले मात्र, नाशिक विभागातील नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तर सोडा; नाशिक जिल्ह्यातील आमदार माणिकराव कोकाटे, जयप्रकाश छाजेड, निर्मला गावित यांनाही त्यांनी बोलविण्याचे कष्ट घेतले नाही. परिणामी खुद्द आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. कॉँग्रेसचे स्थानिक नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनीही कार्यक्रमास न जाणे पसंत केले. हा सारा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना राष्ट्रवादीने कार्यक्रमाचे नियोजन करणार्‍या सामाजिक संघटनांनाही धडा शिकवित हुकूमशाहीचे पुन्हा दर्शन घडविले. खरं तर, आदिवासी गौरव दिनाचे आयोजन विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले. त्यासाठी निमंत्रण पत्रिकांची छपाई करण्यात आली होती; मात्र आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी या संघटनांसह शासनस्तरावरून हा कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या संघटनांना सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले होते. या संघटनांनी दादासाहेब गायकवाड सभागृहाची या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. मात्र, या संघटनांकडून कार्यक्रमाचे नियोजन हिसकावून घेत अधिकार्‍यांनी त्यांच्या आनंदावर विरजन टाकले. मुळात आदिवासी नसताना केवळ या विभागात कर्मचारी म्हणून काम करणार्‍या विक्रम गायकवाड या व्यक्तीने कार्यक्रमात घेतलेल्या पुढाकारावर या संघटनांनी आक्षेप घेत निषेध केला.

कार्यक्रम सरकारीच
आदिवासी सांस्कृतिक परिषदेचा कार्यक्रम सरकारी असून, कोणत्याही विशिष्ट संघटनेने आयोजित केलेला नाही. त्यामुळे शासनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहणे अपेक्षित आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

संघटनांना नोटीस
आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संभाजीराव सरकुंडे, अपर आयुक्त सु. भा. हिंगोणेकर यांनी आदिवासी सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांना भद्रकाली पोलिस ठाण्याकडून नोटीस बजावून कार्यक्रमात व सकाळी निघालेल्या रॅलीत सहभागी होण्यास मज्जाव केल्याचा आरोप या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला.