आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Candidate Of MAHAUTI, Divya Marathi News

उमेदवार सेनेचा नव्हे, महायुतीचा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेचा असला तरी तो केवळ सेनेचा नव्हे, तर महायुतीचा आहे. त्यास निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या बरोबरीने भाजप कार्यकर्त्यांनी संघटितपणे यंत्रणा राबवून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन पक्षाचे सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. हॉटेल रॉयल हेरिटेज येथे भारतीय जनता पक्षाच्या बूथप्रमुखांच्या झालेल्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.
भाजप-शिवसेना ही युती दोन दशकांपासून अभेद्य आहे. महायुतीच्या नाशिक व दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांची समन्वय समिती गठित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
रोज सायंकाळी या समितीतील सदस्यांनी कार्यरचना ठरवून संयुक्त प्रचार करण्याच्या सूचनाही डॉ. फडके यांनी दिल्या. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करीत केंद्रातील युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे र्शेय लाटत असल्याचे सांगितले.
विजय करंजकर यांनी युतीतील प्रत्येकाने आपलाच उमेदवार असल्याचे समजून जिवाचे रान करण्याचे आवाहन केले. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी बूथरचनेचा आढावा सादर केला. नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांनीही मनोगतात भाजपने रिपाइंच्या रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवून आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. सीमा हिरे, विजय साने, सुनील केदार, प्रा. सुहास फरांदे, उमेदवार हेमंत गोडसे, नाना शिलेदार, गोविंद बोरसे आदी उपस्थित होते.
नाराजीचे पुन्हा दर्शन
भाजप पदाधिकार्‍यांमधील राजी-नाराजीचे दर्शन बूथप्रमुखांच्या मेळाव्यात पुन्हा घडले. या मेळाव्यात सुरुवातीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर बसले असताना सरचिटणीस सुनील केदार व इतर दोघे खाली बसले. प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे व आघाडीवर असणारी मंडळी मागे बसल्याने व्यासपीठावरच चर्चा सुरू झाली. अखेरीस उपाध्यक्ष नाना शिलेदार यांनी दोघा पदाधिकार्‍यांना पुन्हा व्यासपीठावर बसण्याचे जाहीर आवाहन केले. त्यानंतर दोघे पदाधिकारी व्यासपीठावर आले.
बूथप्रमुखांच्या मेळाव्यात बाळासाहेब सानप, संभाजी मोरुस्कर, अजय बोरस्ते, लक्ष्मण सावजी, डॉ. राजेंद्र फडके, विजय करंजकर, देवयानी फरांदे, सतीश कुलकर्णी, विजय साने आदी.