आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Mns Vs Shivsena Election Issue At Nashik, Divya Marathi

शिवसेना-मनसेत आज ‘काँटे की टक्कर’ नाशिकरोड, सिडको व सातपूर प्रभाग समिती सभापतिपद निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील तीन प्रभाग समितीवर मनसे व भाजपचा झेंडा फडकल्यानंतर आता शनिवारी होणार्‍या उर्वरित तीन प्रभाग समिती निवडणुकीत मात्र शिवसेना व मनसेत काट्याची टक्कर असेल. पूर्व प्रभागात शिवसेनेने भाजपची पाठराखण केल्यामुळे त्याची परतफेड कशी होणार याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसला महत्त्व नाही; मात्र जनराज्य, माकपसारखे छोटे पक्षाचे नगरसेवक महत्त्वाची भूमिका निभावतील.

शुक्रवारी पंचवटी, नाशिक-पूर्व व पश्चिम या तीन प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक झाली. यात नाशिक पूर्वमध्ये शिवसेनेने मनसे व भाजपची पाठराखण केल्यामुळे अटीतटीच्या लढतीत चिठ्ठीद्वारे भाजपचे प्रा. कुणाल वाघ यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. पश्चिम प्रभागाची निवडणूक अविरोध होऊन येथे मनसेच्या सुनीता मोटकरी यांची निवड झाली. पंचवटीत गेल्या वेळी सभापतिपद मनसेकडे असल्यामुळे यंदा खांदेपालट करून भाजपच्या शालिनी पवार यांना सभापतिपदासाठी संधी दिली.


दरम्यान, शनिवारी सातपूरमध्ये मनसे व शिवसेना पुरस्कृत उमेदवार असा सामना असला तरी, मनसेचे पारडे जड आहे. नाशिकरोडमध्ये मात्र शिवसेना की मनसे असा फैसला भाजपला करावा लागणार असून, भाजप तटस्थ राहिल्यास सेना व रिपाइं मिळून 9 जागा असे समीकरण जुळून शिवसेनेला सभापतिपद मिळेल. सिडको प्रभाग सभापतिपदासाठी होणार्‍या निवडणुकीत मनसे व शिवसेना असा सामना असेल. येथे जनराज्य व माकपची भूमिका महत्त्वाची आहे.