नाशिक - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जारी होईल, या धास्तीने मनसे व राष्ट्रवादीत सुरू झालेल्या चढाओढीत गेल्या 15 दिवसांत तब्बल 607 कोटी रुपयांच्या विकासकामांचा बार उडाला. विशेष म्हणजे, काही कामे अर्धवट असतानाही केवळ प्रसिद्धीसाठी उद्घाटन सोहळे पार पडले.
एरवी कार्यारंभ आदेश मिळण्यापासून तर काम संबधित यंत्रणेकडे हस्तांतरित करून देयक मिळविण्यासाठी धडपड करणार्या ठेकेदारांचेही काम या निमित्ताने सोपे झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, मनसे, व शिवसेना अशी तिरंगी लढत होणार होती. मात्र, आपने विजय पांढरे यांच्या रूपाने वजनदार उमेदवार दिल्याने ही लढत आता चौरंगी झाली आहे. दरम्यान, निवडणूक तोंडावर आल्यामुळे, तसेच आचारसंहितेचे सावट असल्यामुळे आता विकासकामांचे बार उडू लागले आहेत. केंद्र व राज्याच्या सत्तेतील भागीदारीमुळे राष्ट्रवादीकडून मोठय़ा प्रमाणात विकासकामांची उद्घाटने होत आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांच्याकडून केंद्र व राज्यातील निधीतून कामे सुरू असून, दिवसाला किमान एका तरी कामाचे उद्घाटन केले जात आहे. अशीच स्थिती मनसेची असून, शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांच्या माध्यमातून कामांचे बार उडू लागले आहेत. दुसरीकडे पालिकेची सत्ता असल्यामुळे त्या माध्यमातून रिंगरोड व अन्य रस्त्यांच्या 400 कोटी रुपयांच्या कामांनाही सुरुवात केली जात आहे.
ही आहेत विकासकामे
3 मार्च : नाशिक विमानतळाचे उद्घाटन : 82 कोटी रुपये
25 फेब्रुवारी : गंगापूर धरणावरील वॉटर स्पोर्ट्स अँक्टिव्हिटी, मनोरंजन पार्क : 82 कोटी
23 फेब्रुवारी : मनसे आमदार वसंत गिते यांच्या निधीतून समाजमंदिर, व्यायामशाळा, क्रीडांगणे, सामाजिक सभागृह : एक कोटी
22 फेब्रुवारी : महापालिका आणि रिलायन्सकडून गोदापार्क
22 फेब्रुवारी : अटल ज्ञान संकुल इ- अभ्यासिका
21 फेब्रुवारी : त्र्यंबक, इगतपुरी, रस्ते बांधणी : 42 कोटी
20 फेब्रुवारी : ओझर, वणी, सप्तशृंगगड, कळवण विकासकामे : 75 कोटी
20 फेब्रुवारी : सिडको प्रभाग क्रमांक 47 मध्ये विविध विकासकामे : पाच कोटी
17 फेब्रुवारी : ओझरखेड धरण विकास, नाशिक-वणी पूल, भगूर, सिन्नर, बोरमाळ वापी रस्ता रुंदीकरण : 102 कोटी
16 फेब्रुवारी : कोठरे दिगर-सटाणा-मालेगाव मार्ग भूमिपूजन, संगमेश्वर, जोगलटेंभी पर्यटन कामांचे उद्घाटन : 33 कोटी
16 फेब्रुवारी : नाशिक मध्य मतदारसंघात व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा : 67 लाख
15 फेब्रुवारी : देशातील पहिला हिरवा चौपदरी मार्ग, भक्त निवास विर्शामगृह : 160 कोटी
15 फेब्रुवारी : माउली लॉन्स ते प्रणय स्टॅम्पिंग रस्ता : तीन कोटी
14 फेब्रुवारी : कालिकामाता मंदिर भक्त निवास भूमिपूजन : 114 कोटी
शिवसेना, ‘आप’कडे विरोधास्त्र
राष्ट्रवादी व मनसेकडून विकास अस्त्राचा वापर केला जात असताना शिवसेना व ‘आप’ या पक्षाकडून विरोधास्त्राच्या वापराची शक्यता आहे. यात विकासकामांमधील गैरप्रकार, मागील काळातील कामांचा दर्जा आदी मुद्यांवरून सत्ताधार्यांना घेरण्याशिवाय पर्यायही उरलेला नाही.