आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही दोघं भाऊ, एका ताटात जेऊ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - एकत्रित भोजनाने मने अधिक जवळ येत असल्याने कुटुंबातील सदस्यांनी एकत्र भोजन करावे असे नेहमीच म्हटले जाते. हाच नियम राजकारण्यांनीही अंमलात आणल्यास त्यांच्यात मत भिन्नता असली, तरी मन -भेद होणार नाहीत. अर्थात हे भोजन उपहारगृहातल्या टेबलाऐवजी स्वयंपाक घरातले असावे लागते. म्हणून की काय वाजे - दिघोळेंच्या पक्ष प्रवेशासाठी सिन्नरला आलेले अजित पवार आणि छगन भुजबळ या आजी माजी उपमुख्यमंत्र्यांनी हश्चिंद्र लोंढे यांच्या मळ्यातील घरात अगदी ताटाला ताट भिडवून भोजन घेतले आणि हसत खेळत गप्पा गोष्टीही केल्या.
दादा - साहेबांचा हा भोजन सोहळा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि आमदार हेमंतराव टकले यांच्या साक्षीने हलक्या फुलक्या वातावरणात चांगला तासभर रंगला तेव्हा पक्ष संघटनेच्या दृष्टीने हे भोजन किती आरोग्यदायी आहे याचे भाव त्यांच्या चेह-यावर न उमटले तरच नवल!
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यात व छगन भुजबळ यांच्यात दुरावा झाल्याचे चित्र होते. या कथित दुराव्याला जेव्हा जातीपातीचे रंग चिकटले तेव्हा ही बाब पक्ष संघटनेला घातक असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी उभयतांना तशी समज दिल्याच्या वार्ताही प्रसारमाध्यमांमधून झळकल्या.
उभय नेत्यांतील रुसव्याच्या पार्श्वभूमीमुळे की, काय मंगळवारी सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. जाहीर कार्यक्रमात त्यांची केमिस्ट्री चांगली रंगली मात्र, खासगीत काय..? याचाही उलगडा सिन्नरकरांना थोड्याच अवधीत झाला. आग्रहाने जेऊ घालण्याची हौस असलेले माजी नगराध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्या शिर्र्डी रस्त्यावरील मळ््यातील भोजनासाठी उभय नेत्यांनी शेजारी बसणे पसंत केले. माजी नगराध्यक्ष भामाताई लोंढे यांच्या हातचा मटणाचा रस्सा, सुके यांचा उभय नेत्यांनी अगदी चुलीवरच्या भाकरी कुस्करुन आस्वाद घेतला. मधुकर पिचड यांनी मात्र, भज्यांची आमटी, शेंगदाण्याची चटणी आणि मेथीच्या भाजीचे शाकाहारी भोजन पसंत केले. अजितदादांना त्याचाही मोह झाला आणि सामिष भोजनाशी शाकाहारीशी सांगड घालत लोंढे दाम्पत्यांच्या अगत्याची त्यांनी तोंडभरून स्तुतीही केली.
अखेरीस दही-दूध भात घेत पुन्हा भोजनासाठी येण्याची ग्वाही दिली, तेव्हा या सुरात भुजबळांचे सूरही मिसळले. जिकडे पवार - तिकडे भुजबळ आणि जिकडे भुजबळ तिकडे पवार असे वाक्य फेकत आपणात दुही नसल्याचे भाषणातून सांगणा-या भुजबळांनी तसे कृतीतूनही दाखवून दिले. सिन्नरकरांना दिसलेल्या या एकीचे बळ काळाच्या कसोटीवर पक्षाला यशाकडे कसे आणि कुठवर घेऊन जाते ते पहायचे.